ठाकरे सहकार क्षेत्रात उतरणार? उद्धव ठाकरे काढणार साखर कारखाना?

सहकार क्षेत्रापासून अलिप्त असलेले ठाकरे आता कारखानदारी करणार?

Updated: Jun 4, 2022, 08:10 PM IST
ठाकरे सहकार क्षेत्रात उतरणार? उद्धव ठाकरे काढणार साखर कारखाना?

अरूण मेहेत्रे झी मीडिया, पुणे  : सहकार क्षेत्रापासून अलिप्त असलेले ठाकरे आता कारखानदारी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगलीय. या चर्चेमागचं कारण आहे पुण्यातल्या वंसतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये (Vasantdada Sugar Institute) आयोजित करण्यात आलेल्या साखर परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (CM Udhav Thackeray) केलेलं विधान. 

या परिषदेत उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींचं (Nitin Gadkari) भाषण ऐकून मला कारखाना चालू करावासा वाटतो असं वक्तव्य केलं आणि सारेच जण अवाक झाले. मात्र त्यानंतर उद्धव ठाकरेंनी लागलीच आपण ते धाडस करणार नाही असं सांगून मोकळे झाले. पण उद्धव ठाकरेंना काही वेळाकरता का होईना साखर कारखाना काढण्याची प्रेरणा मिळाली ती नितीन गडकरींकडून. 

या परिषदेत गडकरींनी साखर कारखान्याचं महत्व समजावून सांगितलं. येत्या काळात पेट्रोल, डिझेल संपेल आणि त्याची जागा ग्रीन हायड्रोजन घेईल असं नितीन गडकरींनी म्हंटलंय. महत्वाचं म्हणजे प्रत्येक साखर कारखान्यात ग्रीन हायड्रोजन तयार झालं तर साखर कारखान्यांना अतिरिक्त उत्पादन मिळेल, असं त्यांनी सांगितलं.

या साखर परिषदेत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनीही नितीन गडकरींवर स्तुतीसुमनं उधळली. 'आज केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील उसाचा, साखरेचा, इथेनॉलचा किंवा कोणताही प्रश्न आला तर एक व्यक्ती भक्कमपणे ऊस उत्पादकांच्या आणि महाराष्ट्राच्या मागे उभी असते आणि त्या व्यक्तीचं नाव नितीन गडकरी आहे. ते आज या ठिकाणी आहे याचा मला मनापासून आनंद आहे' असं म्हणत शरद पवारांनी नितीन गडकरींचं कौतुक केलं.

सध्या राज्यात दररोज या ना त्या कारणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येतायेत. नेते एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र या साखर परिषदेच्या निमित्तानं का होईना महाराष्ट्रातल्या नेत्यांमधला गोडवा अनुभवायला मिळाला एवढं मात्र नक्की. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x