कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशन येथे २९ सप्टेंबरला दुर्देवी घटना घडली होती. यामध्ये २३ जणांचा मृत्यू झाला होता. अनेक मुंबईकर यावेळी जखमींच्या मदतीसाठी धावले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यापासून रक्त देण्यासाठी रांगा लावताना यावेळी असंख्यजण दिसून आले. असाच अजून एक मुंबईकर आपला खारीचा वाटा यासाठी उभारत आहे. मंगेश अहिवाले असे त्याचे नाव असून तो एलफिन्स्टन परिसरात वडापाव विकतो.
शनिवारी मंगेश एका खास उद्देशानं वडापावचा स्टॉल लावणार आहे. २९ सप्टेंबरला झालेल्या एलफिन्स्टन दुर्घटनेत मयूरेश हळदणकर या युवकाचा मृत्यू झाला. मयुरेश हाच त्याच्या कुटुंबाचा एकमेव आधार होता. त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना मदत करण्यासाठी मंगेश पुढे आलाय. मंगेश १४ ऑक्टोबरला वडापावच्या स्टॉलमधून मिळणारे सगळे उत्पन्न मयुरेशच्या कुटुंबीयांना देणार आहे.
मंगेश दररोज दहा रुपयांना वडापाव विकतो. पण शनिवारी मात्र तो पाच रुपयांनाच वडापाव विकणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी वडापाव खावा आणि मयुरेशच्या घरच्यांना मदत व्हावी, अशी मंगेशची इच्छा आहे..मंगेशचा उद्देश कळल्यापासून त्याच्या स्टॉलवर गर्दी होऊ लागली आहे. मुंबईकर आपणहून त्याला वडापावचे जास्त पैसेही देत आहेत. एलफिन्स्टन दुर्घटनेत जे गेले, त्यांची जागा भरुन काढणं शक्य नाही.पण मंगेशसारखे लोक सामाजिक भान जपत त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीचा हात देतायत यालाच मुंबईकरांचं स्पिरीट म्हणत असावेत.