दिग्गज नेत्यांच्या नकारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण

 लोकसभा निवडणूक लढण्यास अनेक नेत्यांचा नकार 

Updated: Mar 13, 2019, 05:22 PM IST
दिग्गज नेत्यांच्या नकारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीची अडचण title=

दीपक भातुसे, मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजपाची युतीची तयार जोरात सुरू असताना दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष जागावाटप आणि आपले उमेदवार निश्चित करण्याच्या घोळात अडकले आहेत. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी चांगले उमेदवार रिंगणात उतरवण्याची दोन्ही पक्षांची रणनिती होती. मात्र पक्षातील अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिल्याने अनेक ठिकाणी दुय्यम उमेदवार देण्याची वेळ या दोन्ही पक्षांवर आली आहे.

देशात मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत कंबर कसण्याचं ठरवलं आहे. मोदींच्या पराभवासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. मात्र या प्रयत्नांना विरोधी पक्षातील नेत्यांकडूनच खीळ बसत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्रात जास्त जास्त जागा निवडून आणण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. त्यासाठी चांगले आणि तगडे उमेदवार रिंगणात उतरवण्याची दोन्ही पक्षांची रणनिती होती. मात्र दोन्ही पक्षांतील अनेक नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला.

- शिरुरमधून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह होता. मात्र वळसे-पाटील यांनी नकार दिल्याने पक्षाने अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना पक्षात घेऊन येथे उमेदवारी दिली आहे.

- ठाण्यातून गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी असा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. तशी विनंतीही पक्षाने त्यांना केली होती. मात्र नाईक यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

- नाशिकमधून छगन भुजबळ यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती पक्षाने छगन भुजबळ यांना केली होती. मात्र भुजबळ तयार नसल्याने त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांचे नाव इथून निश्चित केले जाणार आहे.

राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही तिच परिस्थिती आहे.

- संजय निरुपम यांना उत्तर मुंबईतून निवडणूक लढवायची नाही. त्याऐवजी त्यांना उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी हवी आहे.

- हिंगोलीतून विद्यमान खासदार राजीव सातव यांनी निवडणूक लढवावी अशी पक्षाची इच्छा आहे. मात्र २०१४ च्या निवडणुकीत केवळ १ हजार ६३२ मतांनी विजयी झालेले सातव यावेळी निवडणूक लढवण्यास तयार नाहीत.

- नांदेडमधून विद्यमान खासदार अशोक चव्हाण निवडणूक लढवण्यास इच्छूक नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी त्यांची मागणी आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्ता आली तर अशोक चव्हाण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याने त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याचं समजतं.

- पुण्यात काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. त्यामुळे इथून पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षाने त्यांना केला होता. मात्र पृथ्वीराज चव्हाणही लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार नाहीत.

- सांगलीतही काँग्रेसची तिच अवस्था आहे. इथे काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे आमदार विश्वजित कदम यांनी इथून निवडणूक लढवावी असा काँग्रेसचा प्रयत्न होता. मात्र विश्वजित कदम यांनीही लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे.

दोन्ही पक्षातील दिग्गज नेत्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने त्या त्या मतदारसंघांमध्ये दुसरा उमेदवार शोधण्याची वेळ पक्षावर आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खासदार निवडून देण्याच्या आपल्याच उद्दीष्ट्यावर या पक्षाच्या नेत्यांनी पाणी फिरवलं आहे. 

राज्यात २०१४ प्रमाणे मोदी लाट नाही, विद्यमान सरकारविरोधात ग्रामीण भागात असंतोष आहे. त्यामुळे विधानसभेला आपली सत्ता येईल असा विश्वास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना वाटतो आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणूक लढवून केवळ खासदार बनण्याऐवजी विधानसभा निवडणूक लढवून सत्ता आली तर राज्यात मंत्रीपद मिळू शकतं असे स्वप्न दोन्ही पक्षातील नेते पाहत आहेत.