मुंबई : विधीमंडळात एकमतानं मंजूर करण्यात आलेलं मराठा आरक्षणाचं विधेयक आज राज्यापालांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवारी आरक्षणाबाबत अधिसूचना काढण्यात येणार आहे. या आरक्षणाला कुणी आव्हान देऊ नये यासाठी सोमवारीच उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात येणार आहे. आज विधीमंडळात मराठा आरक्षणाच्या विधेयकाला काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर छोट्या विरोधी पक्षांनीही पाठिंबा दर्शवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आधी विधानसभेत हे विधेयक मांडलं. हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी या विधेयकाला पाठिंबा दर्शवला. त्यानंतर हे विधेयक विधानपरिषदेत मांडण्यात आलं.
भाजप आमदारांनी मात्र विधेयक मांडण्यापूर्वीच विधानभवनाच्या परिसरात जल्लोष केला.
भगवे फेटे बांधून पेढेही वाटले, त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विधेयक मांडण्यासाठी विधानसभेत प्रवेश केला.
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.