'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा

Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या.   

सायली पाटील | Updated: Jul 5, 2023, 01:26 PM IST
'शरद पवार आदर्श पण दादा मात्र...'; अजित पवारांना पाठिंबा देत सविता मालपेकरांनी वळवल्या नजरा  title=
Marathi Actress savita malpekar attends ajit pawar ncp group meeting at met mumbai

Maharashtra Political Crisis : मराठी कलाजगतातील एक प्रसिद्ध नाव, अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही एमईटी गाठत तिथं अजित पवार यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या प्रतिक्रियेनं नजरा वळवल्या. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय वर्तुळात शरद पवार आणि अजित पवार असे गट विभागले गेले आणि या साऱ्यामध्ये कार्यकर्त्यांचेही दोन गट झाले. ज्यानंत्यानं आपल्या नेत्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मराठी कलाजगतातील कलाकार मंडळी आणि राष्ट्रवादी पक्षातील काही लोकप्रिय चेहरेही यात मागे राहिले नाहीत. सविता मालपेकरही त्यातल्याच एक. 

 

बुधवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी म्हणजेच पक्षप्रमुख शरद पवार आणि  पक्षात बंडखोरी करणारे अजित पवार या दोघांनीही मुंबईतच शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी शरद पवार यांच्या गटानं मुंबईतील वाय.बी. चव्हाण सेंटर आणि अजित पवार गटानं वांद्रे येथील एमईटी अशी स्थळं निवडली. 

हेसुद्धा वाचा : केंद्र सरकारकडून महिलांना 6000 रुपये, लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज !

दोन्ही नेत्यांनी दिलेली हाक ऐकून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या समर्थनार्थ त्या-त्या ठिकाणी पोहोचले आणि आपला गट किती भक्कम आहे हेच सांगण्याचा प्रयत्न केला. शरद पवार याच्याप्रती निष्ठा दाखवत अनेक राष्ट्रवादी समर्थकांनी वायबी चव्हाण सेंटर गाठलं. तर तिथं नवनियुक्त मंत्र्यांनी आपल्या समर्थनार्थ आलेल्या समर्थकांचं स्वागत केलं. अजित पवार गटाला पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा आकडा सहा हजारांच्या घरात गेल्याचं सांगितलं गेलं. जिथं एका चेहऱ्यानं सर्वांच्याच नजरा वळवल्या. तो चेहरा ठरा सविता मालपेकर यांचा. शरद पवार आपल्यासाठी आदर्शस्थानी आहेत असं म्हणणाऱ्या मालपेकर यांनी यावेळी नेमका अजित पवार यांना पाठिंबा का दिला हेसुद्धा स्पष्ट केलं. 

काय म्हणाल्या मालपेकर? 

आपण मागील अडीच वर्षांपासून राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीस असल्याचं सांगत सविता मालपेकर पुढे म्हणाल्या, 'मुख्य नेतेमंडळी सध्या भाजपसोबत गेले असून, त्यांचा हा निर्णय महाराष्ट्रात बदल घडवण्यासाठी घेण्यात आला असून, तो मलाही भावला. या एका कारणामुळं मी अजित पवार यांच्या गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला.'

तिनही पक्षांचं सरकार मिळून आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होण्यासोबत देशातही राज्याचा पहिला क्रमांक असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या साऱ्याची गरज होती, या वाक्यावर जोर देत त्यांनी आपली भूमिका 'झी 24तास'शी संवाद साधताना स्पष्ट केली. 

शरद पवार यांच्याविषयी काय म्हणाल्या मालपेकर? 

आपल्यासोबत गार्गी फुले, प्रभाकर मोरे, विजय पाटकर या कलाकांराची अजित दादांना पाठिंबा असेल असं म्हणत शरद पवार यांच्याविषयीसुद्धा त्यांनी आपले विचार मांडले. अजित पवार यांचा उल्लेख तडफदार नेतृत्त्वं म्हणून करताना त्यांनी शरद पवार आपल्याला आदर्शस्थानी असल्याचंही स्पष्ट केलं. 'पवार साहेब कर आमचे आदर्श आहेत. त्यांना आमचा पाठिंबा नाही असं नाही, पण सद्यस्थिती पाहता त्यासाठी अजित पवारच उत्तम नेतृत्वं आहेत. त्यांची ठाम वृत्ती, त्यांची काम करण्याची पद्धत आणि त्यांचा स्पष्टवक्तेपणा नेहमीच मला भावतो', असंही त्या म्हणाल्या. आम्ही पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊनच पुढे जातोय असंही त्या म्हणाल्या. यावेळी ते कलाकारांच्या पाठिशी कायमच उभे राहिले आहेत असंही त्यांनी न विसरता स्पष्ट केलं.