मैदानाच्या नावावर बिल्डरनं सरकारला चुना लावला?

मुंबईत काँक्रीटच्या जंगलात मैदानांचा शोध घ्यावा लागतो...  जी काही मैदानं आहेत त्यांची घुसमटत होतेय... विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना कार्यलयालगतच एका मैदानाचा असाच गळा घोटण्यात आलाय.

Updated: Apr 3, 2018, 10:14 PM IST
मैदानाच्या नावावर बिल्डरनं सरकारला चुना लावला? title=

मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत काँक्रीटच्या जंगलात मैदानांचा शोध घ्यावा लागतो...  जी काही मैदानं आहेत त्यांची घुसमटत होतेय... विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना कार्यलयालगतच एका मैदानाचा असाच गळा घोटण्यात आलाय.

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना कार्यालयाजवळचं हे मैदान...  याच कार्यालयाला खेटून एकेकाळी एक गिरणी होती. या ठिकाणी आता एक टोलेजंग इमारत उभी रहातेय. गिरणीच्या जमिनीवर इमारत उभी करायची असेल तर जमिनीच्या आकारमानानुसार ठराविक जमीन ही बिल्डरला पालिकेला मैदानासाठी द्यावी लागले. या बिल्डरने नियमानुसार मैदान दिलंय खरं... मात्र सामना शेजारचं हे शहीद कर्नल संतोष महाडिक मैदान पाहिल्यावर याला नक्की मैदान म्हणावं का? असा प्रश्न पडतो... छोटासा त्रिकोण मैदान म्हणून सामान्यांच्या माथी मारण्यात आलंय. 

विशेष म्हणजे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी या मैदानाचं उद्धघाटन करण्यात आलं. मात्र या मैदानाच्या मुख्य गेटला नेहमीच कुलूप असतं. या सगळ्या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचेच नेते करत आहेत. 

या प्रकरणी आम्ही मनपा अधिकाऱ्यांना विचारलं... पण हे प्रकरण यापूर्वीच्या अधिकाऱ्यांकडे आणि दुसऱ्या विभागाकडे असल्याचं सांगत त्यांनी बोलणं टाळलं. शिवसेना गेली २० वर्षं मुंबई महापालिकेत सत्तेत आहे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना मैदानांबद्दल आस्था आहे... असं असताना 'सामना' जवळच्या मैदानाच्या बाबतीत हे घडावं, हे दुर्दैवच...