Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास कराच्या विचारात असणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी. नाताळसणाच्या सुट्टीमुळं मध्य रेल्वेवर बुधवारी (आज) रविवारच्या वेळापत्रकाप्रमाणे लोकल चालविण्यात येणार आहेत. परिणामी प्रवाशांना घराबाहेर पडताना हे बदललेलं वेळापत्रक बघूनच बाहेर पडावं लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या डीआरएम यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून यासंदर्भातील अधिकृत माहिती देण्यात आली. जिथं, प्रवाशांनी वेळापत्रक तपासूनच प्रवास करावा, अशी विनंती मध्य रेल्वेने केली आहे. सहसा दर दिवशी मध्य रेल्वेवर 1810 लोकल सेवा चालवल्या जातात आणि रविवारी त्यापैकी सुमारे 350 ते 400 लोकल कमी धावतात. त्यामुळं ज्यांना सुट्टी लागू नाही, त्या मंडळींसाठी प्रवासात काही अडथळे निर्माण होऊ शकतात.
मध्य रेल्वेच्या रविवारच्या वेळापत्रकानुसार अनेक एसी लोकल रद्द केल्या जातात. ख्रिसमसच्या दिवशी अनेक कार्यालयांना सुट्टी नसल्यामुळं ज्यांना नोकरीच्या निमित्तानं घराबाहेर पडावं लागत आहे त्यामुळं प्रवासाचं नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
रेल्वेच्या वेळापत्रकातील या बदलामुळे दररोजच्या प्रवाशांना मात्र अडचणींचा सामना करावा लागणार असून, त्यांना कार्यालयामध्ये जाण्यास उशीर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान शासकीय कार्यालयांना ख्रिसमसनिमित्त सुट्टी असल्यामुळं काही लोकलमधील गर्दी मात्र कमी राहणार आहे. असं असलं तरीही सुट्टीच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्यांची वर्दळ मात्र रेल्वे स्थानकावर नाकारता येत नाही.
एकिकडे रेल्वे प्रशासनानं सुट्टीचं वेळापत्रक लागू केलं असून, दुसरीकडे मुंबई शहरात प्रशासकीय यंत्रणाही सर्वतोपरि सज्ज झाल्या आहेत. 24, 25 आणि 31 डिसेंबरला गृह विभागाने पहाटे 5 वाजेपर्यंत बार सुरू ठेवण्याची परवानगी दिली असतानाच या तिन्ही दिवशी नागरिकांचा जल्लोष सुरू असताना काही समाजकंटकांकडून दरम्यान कोणताही गैरफायदा उचलला जाऊ नये यासाठी मुंबई पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहेत.
मंगळवारी रात्रीपासून शहरात कोम्बिंग ऑपरेशन, हॉटेल-लॉजिंगची तपासणी सुरू असून नाकाबंदी असल्याचं पाहायला मिळत आहे. ख्रिसमस आणि थर्टी फर्स्टनिमित्त हॉटेलबरोबरच समुद्रकिनाऱ्यांवरही पार्टीचं आयोजन केलं जात असल्यामुळं तिथंही गस्त ठेवण्यात आली असून, तटरक्षक दलापासून इतर सर्वच यंत्रणा सध्या कामाला लागली आहे.