बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण, नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया

पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल चढवला आहे.

Updated: Aug 20, 2021, 12:15 PM IST
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे शुद्धीकरण, नारायण राणे यांची पहिली प्रतिक्रिया title=

मुंबई : पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane) यांनी शिवसेनेवर (Shiv Sena) हल्लाबोल चढवला आहे. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिवसैनिकांना खडे बोलही सुनावले.

दरम्यान, शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर केली आहे. लाचारीतूनच आज विरोधकांच्या बैठकीला उपस्थिती लावणार असल्याचे टीकास्त्र त्यांनी यावेळी केले. राणे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी मी पत्रकारितेचा आदर करतो. महाराष्ट्राच्या पत्रकारितेला वेगळं स्थान आहे. मी पत्रकारितेला व्यवसाय म्हणत नाही. पत्रकारांचं मार्गदर्शन आम्हालाही मिळावं, तुमच्या अनुभवाचा देशाच्या प्रगतीला फायदा व्हावा अशी अपेक्षा असते. मात्र सध्या पत्रकार मला देशातील प्रश्नांबद्दल विचारण्याऐवजी केवळ गोमूत्र आणि गोमूत्र या एकाच विषयाबद्दल सतत विचारणा करत आहेत. या एकाच विषयासाठी आम्ही आलो आहोत का?, असा प्रति सवाल केला.

राणेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडलं? काय दूषित झालं होते, अशी त्यांनी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाच्या अवस्थेबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, एवढाच जर स्मारकाबद्दल आदर आहे, तर ते ज्या स्थितीत आहे, त्याकडे लक्ष द्या. पँट वर करून दलदलीतून तिकडे जावं लागतं. मी अनेक स्मारकं पाहिली आहेत, त्याच्या आजूबाजूला सुंदर लॉन असतं, सुशोभीकरण केलेलं असतं. झाडं आहेत. इथे काय आहे? साहेबांचा फोटोही नीट दिसत नाही. जे गोमूत्र शिंपडायला आले ना, त्यांनी ते स्मारक जागतिक किर्तीचं कसं होईल याकडेही पाहावं, हेच माझं त्यांना उत्तर आहे. स्मारकाचं शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी मन शुद्ध करा, असे राणे म्हणाले.

राणे म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून असेच यश मिळव, असा आशीर्वाद दिला असता. त्यांनीच मला घडविले आहे. त्यामुळे कोणत्याही दैवताचे स्मारक असो, तिथे विरोधाची भाषा करू नये, भावनांचा विचार करावा. विरोध करण्यासाठी डाव्या-उजव्या नेत्याला बोलायला लावू नये. स्वत: बोलावे. आम्ही जशास तसे उत्तर देऊ शकतो आणि तशी ख्याती आहे. मांजरीसारखं आडवे येऊ नये. ज्यांना स्वातंत्र्याचा अमृत की हिरक महोत्सव माहित नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, अशी खोचक टीकाही राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली.