Maratha Reservation MLA Resign: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर सरकारवर टीका केली. तसेच आरक्षण मुद्द्यावरुन राजीनामे देणाऱ्या आमदारांनाही टोला लगावला. आरक्षणाच्या मुद्द्यावर अजुनही मार्ग निघत नाही. काल मुख्यमंत्र्यांनी मिटींग घेतली पण याला दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. एका मुख्यमंत्र्यांना डेंग्यु झाला तर दुसरे पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले आहे. कृपा करुन तुम्ही टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन त्यांनी जरांगे पाटलांना केले आहे.
महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. मराठ्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे. त्यांना दुसऱ्याच्या पानात वाढलेलं कधीच नकोय. राज्याच्या पातळीवर प्रश्न सोडवा..काहीही करा पण मार्ग काढा, असेही ते म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत सर्व समाजाच्या हक्कांना धक्का न लावता यातून मार्ग काढा. लोकसभेत हा प्रश्न सोडवू शकतो. संसदेत तात्काळ अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण सोडवू शकतो, असे ते म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी नव्हे तर अपात्र होण्याआधी हे आमदार राजीनामा देत असल्याचे ठाकरे म्हणाले. अपात्र होण्याआधी सहानभूती मिळवण्याचा हे प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
राजीनामे कर्तव्य म्हणून दिले तरी मोदी सरकारवर याचा काही परिणाम होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. मणिपूर जळतंय, महाराष्ट्र पेटतोय पण पंतप्रधानांना याच्याशी देणंघेणं नाहीय, असेही ते म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या देशातील महत्व, देशाची घटना, देशाची लोकशाही टिकणार आहे की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. सर्वात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. लवाद सर्वोच्च न्यायलयाचे निर्णय झुगारुन आपल्या मर्जीने वागायला लागले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने अहवाल दिला आहे. हे निर्देश राज्यातील जनतेला कळाला पाहिजे. सर्व आमदारांनी हे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांपर्यंत पोहोचवा आणि त्याचे वाचन करा, असे आवाहन त्यांनी केले.