Maharashtra Political Crisis : विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election) दुसऱ्याच दिवशी शिवसेनेत (ShivSena) उभी फूट पडली. काल शिवसेनेचे नाराज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सूरत गाठलं होते. यामध्ये शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचाही सामावेश होता. मात्र आमदार नितीन देखमुख गुवाहटीवरून आता अमरावतीमध्ये परतले आहेत. अमरावतीत परतल्यावर शिवसेनेकडून आमदार देशमुख यांचं स्वागत करण्यात आलं आहे.
दरम्यान, शिवसेनेनं काल केलेली अजय चौधरी यांची गटनेतेपदाची निवड अवैध असल्याचं पत्र एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना देण्यात आलं . एकनाथ शिंदे यांच्या पत्रावर शिवसेनेच्या 34 आमदारांच्या सह्या आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर आपली सही नाही असं सांगत आमदार नितीन देशमुख यांनी खळबळ उडवून दिली आहे.
एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर तिसऱ्या नंबरवर आमदार नितीन देशमुख यांचं नाव आणि सही आहे. पण ही सही आपली नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. सही दुसऱ्या कोणी केली आहे का मला माहित नाही पण ही सही माझी नाही. मला कोणतीही सही करण्यास सांगितलेलं नाही. मुळात मी मराठीत सही करत नाही मी इंग्रजीत सही करतो असा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे.
तसंच सूरतमध्ये मला जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करुन इंजेक्शन टोचलं हा आरोप नसून वस्तूस्थिती असल्याचंही नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. गुजरातमध्ये हॉटेलला तीनशे चारशे पोलिसांचा पहारा होता, गुजरातचे पोलीस राज्याचं कि कोणत्या पक्षाचं काम करतात ही वस्तूस्थिती पाहिला मिळाली.
मी दुपारी तिथून निघालो, माझ्या मोबाईलची बॅटरी डाऊन झाली होती आणि पाऊसही पडत होता, अशा परिस्थितीत मी निघालो, पण माझ्यामागे पोलिसांचा ताफा होता, मला नेण्यासाठी महाराष्ट्रातून गाडी येणार आहे असं समजताच तिथल्या स्थानिक पोलिसांनी मला जबरदस्ती उचलून गाडीत कोंबलं आणि सरकारी दवाखान्यात नेलं, तेव्हाच माझ्या मनात शंका निर्माण झाली. कुठेतरी आपला घातपात केला जात असल्याचं मला कळलं, मला सांगितलं गेलं मला हार्टअटॅक आला, असं नितीन देशमुख यांनी सांगितलं.