देवेंद्र कोल्हटकर, झी २४ तास, मुंबई : ठाकरे घराण्यातली चौथी पिढी राजकारणात सक्रीय झालीय. याच पिढीचा शिलेदार असलेला राजपुत्र... अर्थात अमित राज ठाकरे..मनसेच्या नेतेपदी विराजमान होऊन अमित ठाकरेंना (Amit Thackeray) एक वर्ष पूर्ण झालंय. सक्रीय राजकारणातला त्यांचा वर्षभरातला प्रवास, पाहूयात..
अमित राज ठाकरे हा मनसेचा युवा चेहरा आहेत. राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray) यांच्यानंतर मनसे कार्यकर्त्यांत सर्वाधिक क्रेझ असणारं युवा नेतृत्व आहे. २३ जानेवारी २०२० रोजी मनसेच्या पहिल्या अधिवेशनात अमित ठाकरे यांची राजकीय पटलावर एन्ट्री झाली.
राज ठाकरेंच्या घरात, सहवासात वाढलेल्या अमित यांची थेट नेतेपदी निवड झाली. कार्यकर्त्यांमध्ये थेट मिसळून काम करणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं यामुळे अल्पावधीतच अमित ठाकरे यांनी पक्षात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
अमित ठाकरे नेते झाले आणि कोरोना काळ सुरू झाला. कोरोना रुग्ण, डॉक्टर्स, आशा वर्कर, विद्यार्थी, मजूर यांच्या समस्या आणि अडचणी त्यांनी समजून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी सरकारदरबारी पत्रव्यवहार केला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, आरोग्य मंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटी घेऊन जनतेचे प्रश्न मांडले. कृष्णकुंजवर राज ठाकरेंसोबतच अमित ठाकरेंना भेटायलाही लोक येऊ लागले.
राजकारणात कोणत्याही नेतृत्वाची कसोटी निवडणुकीत लागते. पुढच्या वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाचा खरा कस लागणाराय. मनसे आणि अमित राज ठाकरे या परीक्षेत पास होणार का? घोडा मैदान फार दूर नाही.