मुंबई : लोकलमध्ये महिलांना गंडवून त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचने अटक केलीय. नवऱ्याची नोकरी गेल्यानं हे काम सुरू केल्याची धक्कादायक कबूली तिनं दिलीयं. त्रिशला भालेराव असं या तरुणीचं नाव. दागिने घालून लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांकडे आधी पिण्यासाठी पाणी मागून ती बोलणं सुरू करायची, मग महिलांनी दागिने सांभाळण्याची अनाउन्समेंट रेल्वेकडून केली जात असल्याची बतावणी करत महिलांना त्यांचे दागिने पर्समध्ये ठेवायला ती सांगायची. काही वेळानं लोकलमध्ये गर्दी झाली, की संधी साधत हे दागिने चोरून ती पसार व्हायची.
सध्या ती कल्याण रेल्वे क्राईम ब्रँचच्या ताब्यात असून तिने चोरलेले साडेतीन लाख रुपयांचे दागिने पोलिसांनी तिच्याकडून हस्तगत केलेत. अशाप्रकारे तिनं किती चोऱ्या केल्या? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.