मुंबईत तीन वर्षांचा चिमुकला गटारात पडून बेपत्ता

तीन वर्षांचा चिमुकला उघड्या गटारात पडला आणि तो वाहून गेला. 

ANI | Updated: Jul 11, 2019, 11:22 AM IST
मुंबईत तीन वर्षांचा चिमुकला गटारात पडून बेपत्ता title=

मुंबई : एक धक्कादायक घटना. रात्रीच्यावेळी खेळताना घरातून बाहेर रस्त्यावर आलेला तीन वर्षांचा चिमुकला पुन्हा घरात येत असताना उघड्या गटारात पडला आणि तो वाहून जाऊन बेपत्ता झाला आहे. हा मुलगा कसा पडला याचे चित्रण सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहे. ही घटना पाहताना अंगावर काटा उभा राहतो. 

हा तीन वर्षांचा चिमुकला वाहून गेल्याची दुदैवी घटना गोरेगाव आंबेडकरनगर  येथे घडली आहे. काल रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बेपत्ता झालेल्या मुलाचा शोध बचाव पथक घेत आहेत. या घटनेनंतर तीव्र चीड व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेला महापालिकाच जबाबदार आहे. गटार बंदीस्त केले असते तर ही घटना घडली नसली, अशी संतप्त नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गोरेगाव परिसरात काल मुसळधार पाऊस सुरु होता. ज्या ठिकाणी हा चिमुलकला राहत होता. तेथे गटार उघडे होते. पावसामुळे गटारातील पाण्याचा प्रवाह मोठा होता. त्यामुळे हा चिमुकला वाहून केला. चिमुकला रात्रीच्या सुमारास खेळताना घराबाहेर आला. यावेळी बाहेर काहीसा अंधार असल्याने तो चुकून या उघड्या गटारात पडला आणि त्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेला, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. तसेच  घटनास्थळावरील बाजूच्या एका दुकानाबाहेर लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. त्यानंतर या मुलाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरु झाला.