मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत.

Updated: Aug 19, 2020, 03:16 PM IST
 मध्य रेल्वेच्या मालमत्तेवर ड्रोनची नजर

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने (Mumbai Division of Central Railway) स्टेशन परिसर, रेल्वे मार्ग, यार्ड, कार्यशाळा यांसारख्या रेल्वे क्षेत्राचं संरक्षण आणि देखरेखीसाठी दोन Ninja UAVs खरेदी केली आहेत. रेल्वेच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी रेल्वेने आता ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. ड्रोनच्या साहाय्याने रेल्वेने दोन चोरही पकडले आहेत. वाडीबंदर आणि कळंबोलीमध्ये दोन चोरांना पकण्यात आलं आहे. यार्डात रेल्वेच्या कोचमध्ये चोरी करताना हे चोर ड्रोनमध्ये आढळले आहेत. 

मध्य रेल्वेच्या यार्ड आणि मालमत्तेवर आता ड्रोनची नजर असणार आहे. मध्यरेल्वेचं परिक्षेत्र प्रचंड मोठं आहे. त्यात अनेक यार्ड, मध्यरेल्वेची मालमत्ता आहे. यापूर्वी अनेकदा येथे चोरीच्या घटना  घडल्या आहेत. त्यामुळे या सगळ्याला आळा घालण्यासाठी ड्रोनचा वापर होणार आहे. तसंच मध्यरेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोठी गर्दी असते, त्यावरही ड्रोनची नजर असणार आहे. 

आरपीएफच्या मॉर्डरायझेशन सेलमधील चार कर्मचाऱ्यांच्या पथकाला या ड्रोन संदर्भात प्रशिक्षण देण्यात आलं आहे. तसंच या ड्रोन उड्डाणासाठी परवानाही मिळाला आहे.