सावधान... लवकरच मुंबई बुडणार? दरवर्षी 2 मिमीनं बुडतेय मुंबई

मुंबईवर निसर्गाचं मोठं संकट घोंगावतंय, दरवर्षी मुंबई शहर हळुहळु बुडतंय 

Updated: Jun 13, 2022, 07:52 PM IST
सावधान... लवकरच मुंबई बुडणार? दरवर्षी 2 मिमीनं बुडतेय मुंबई title=

Mumbai Sinking : विशाल सागरी किनारा लाभलेलं शहर मुंबई, भारताची आर्थिक राजधानी. पण समुद्राने वेढलेल्या या मुंबईला समुद्राचाच धोका निर्माण झाला आहे. समुद्राच्या लाटा काळ बनून मायानगरीत कधी घुसतील याचा नेम नाही. कारण वैज्ञानिकांनी तसा इशारा दिलाय. 

जगभरातील 99 देशांचा अभ्यास करून वैज्ञानिकांनी तयार केलेला हा अहवाल जिओफिजिकल रिसर्च लेटर्स या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. 

मुंबई शहर बुडतंय
मुंबई शहर दरवर्षी 2 मिमीनं बुडत असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. मुंबईत जमिनीचा भाग कमी होतोय,  तर पुराचा धोका वाढतोय.
मुंबईचं बुडण्याचं प्रमाण जगातील इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. मात्र समुद्राची पातळी वाढल्यानं आणि कालांतराने होणाऱ्या अतिवृष्टीमुळे हा वेग वाढेल, असा इशारा वैज्ञानिकांनी दिलाय.

अरबी समुद्राच्या पाण्याच्या पातळीत दरवर्षी 0.5 ते 3 मिमी वाढ होतेय. शिवाय भूगर्भातील पाण्याचा उपसा, खाणकाम, पायाभूत सुविधा प्रकल्प यामुळं पर्यावरणाची हानी होतेय, याकडे देखील वैज्ञानिकांनी या अहवालात लक्ष वेधलंय.

मुंबई बुडण्यापासून वाचवण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याची चिंता सध्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सतावतेय. मुंबईत आजही अनेक ठिकाणी नैसर्गिक पाणीस्त्रोत संपवण्याचं काम सुरु आहे. 

याबाबत वेळीच उपाय आखले नाहीत तर देशाची आर्थिक राजधानी असलेलं हे शहर अरबी समुद्रात गुडूप व्हायला वेळ लागणार नाही.