Maharashtra Politics : खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी दाखल केलेली मानहानी याचिका प्रकरणात ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना कोर्टाने समन्स (Summons) बजावलं आहे. 14 जुलैला या दोघांनाही न्यायालयात हजर राहाण्याचे आदेश मुंबई न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र असलेल्या सामना (Saamana) दैनिकात एक लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यात आपल्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध केल्याची तक्रार खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी हा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. यात राहुल शेवाळे आणि कराचीमधल्या रिअर इस्टेटमध्ये हितसंबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता.
लेख प्रसिद्ध झाल्यानंतर राहुल शेवाळे यांचे वकिल चित्रा साळुंखे यांनी दैनिक सामनाला यांना नोटीस पाठवून बातमीचा स्त्रोत काय आहे याचा जाब विचारला. यावर दैनिक सामनाने इंटरनेटवर चर्चा करणाऱ्या एका महिलेकडून हे ऐकलं होतं, आणि त्या आधारावर बातमी दिल्याचं सांगितलं. यानंतर राहुल शेवाळे यांनी मानहानीची तक्रार दाख करत मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला.
आज या प्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने ट्ऱॉम्बे पोलिसांना याप्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलिसांनी खासदार राहुल शेवाळे यांचा जबाब नोंदवला, यावेळी शेवाळे यांनी सामनात प्रसिद्ध झालेला लेख पुरावा म्हणून सादर केला. याप्रकरणी कोर्टात सामनातल्या चुकीच्या बातमीमुळे राहुल शेवाळे यांना गंभीर राजकीय परिणाम भोगावे लागले असा दावा राहुल शेवाळे यांच्या वकिलांनी केला. राहुल शेवाळे यांच्या वकिलांची बाजू ऐकून घेतल्यानंतर दंडाधिकारी न्यायालयाने उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 14 जुलै रोजी न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर खासदार राहुल शेवाळे हे शिंद गटात सामील झाले. त्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि खासदार राहुल शेवाळे यांच्यात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. राहुल शेवाळे सध्या लोकसभेत शिवसेना पक्षाचे नेते म्हणून जबाबदारी सांभाळतात. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी एका महिलेने राहुल शेवाळे यांच्यावर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप केलो होते. हे आरोप राहुल शेवाळे यांन फेटाळून लावले. तसंच आपली राजकीय कारकिर्द संपण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केला होता.