दहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी दिली आहे. 

राजीव कासले | Updated: Oct 26, 2024, 09:28 PM IST
दहिसरमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, भाजपच्या मनिषा चौधरींसमोर तगडं आव्हान title=

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) उमेदवारांची घोषणा केली जात आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने घोसाळकर कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी देत भाजपासमोर तगडं आव्हान उभं केलं आहे. दहिसर मतदारसंघातून ठाकरेंच्या शिवसेनेने तेजस्वी घोसाळकर (Tejasvee  Ghosalkar) यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी आज मातोश्रीवर जात एबी फॉर्म घेतला. तेजस्वीचे सासरे माजी आमदार विनोद घोसाळकरही या जागेवर इच्छुक आहेत. पण मातोश्रीचा तेजस्वी घोसाळकरांना ग्रीन सिग्नल असल्याचं सांगितलं जात आहे.

 

तेजस्वी घोसाळकर यांच्या उमेदवारीमुळे दहिसरमध्ये चुरशीची लढत होणार आहे. दहिसरमध्ये भाजपाच्या मनिषा चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका असून त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची 8 फेब्रूवारी 2024 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

अभिषेक घोसाळकर हे ठाकरे यांचे समर्थक होते. ते शिवसेनेचे माज नगरसेवकही राहिलेले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात घोसाळकर कुटुंबियांचा चांगला जनसंपर्क आहे. लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा होती. पण हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने भूषण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. भूषण पाटील यांचा पराभव झाला होता. तेजस्वी घोसाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत इथून निवडणूक लढवावी असा पर्यायही ठेवण्यात आला होता. पण हा पर्याय तेजस्वी घोसाळकर यांनी नाकारला होता. 

आता विधानसभा निवडणुकीत दहिसर विधानसभा मतदारसंघातून तेजस्वी घोसाळकर यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. उत्तर मुंबई हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदार संघात तेजस्वी घोसाळकर कशी लढत देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

शिवसेना (UBT) पक्षाच्या मुंबईतील जागा - 
1. भायखळा 
2. शिवडी 
3. वरळी 
4. वडाळा 
5. दादर माहीम 
6. मागाठाणे 
7. विक्रोळी 
8. भांडुप पश्चिम 
9. जोगेश्वरी पूर्व 
10. दिंडोशी 
11. अंधेरी पूर्व 
12. चेंबूर 
13. कुर्ला
14. वांद्रे पूर्व 
15. कलिना 
16. गोरेगाव
17. वर्सोवा 
18. घाटकोपर पश्चिम 
19. विलेपार्ले
20.दहिसर