समीर वानखेडेंवर आरोप : क्रांती रेडकर हिचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आज बाळासाहेब असते तर...

Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.  

Updated: Oct 28, 2021, 01:21 PM IST
समीर वानखेडेंवर आरोप : क्रांती रेडकर हिचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आज बाळासाहेब असते तर... title=
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai Drugs Case : NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मला योग्य तो न्याय मिळावा, अशी मागणी तिने या पत्रात केली आहे. माझ्या कुटुंबाची नाहक बदनामी सुरु आहे, असे तिने पत्रात म्हटले आहे. (Kranti Redkar's letter to CM  Udhhav Thackeray)

दरम्यान, क्रांती रेडकर हिने शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना फोन करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. पण अद्याप त्यांना भेटीची वेळ मिळालेली नाही. क्रांती रेडकर हिने तिचे म्हणणं मुख्यमंत्र्यांना भेटून सांगायचे आहे. त्यासाठी तिने मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे.

मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai Drugs Case) बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला NCB ने ताब्यात घेत अटक केली. सध्या तो जेलमध्ये आहे. दरम्यान, या ड्रग्ज पार्टीला वेगळे वळण लागले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणी तपास करणारे NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला फर्जीवाडा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी एकाची नोकरी खोटा दाखला देऊन घेतली आहे, असा आरोप केला आहे. याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.

तसेच ड्रग्ज पार्टीत (Mumbai Drugs Case) असलेला आंतरराष्ट्रीय माफिया NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा मित्र असल्याचा  खळबळजनक दावा नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. दरम्यान, वानखेडे यांचे बर्थ सर्टिफिकेटचे आरोप खोटे ठरल्यास राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान मलिक यांनी दिले आहे. त्यानंतर समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने सगळे आरोप फेटाळत आमची बदनामी करु नका, तुम्हाला काय करायचे आहे ते न्यायालयात जा, असा सल्ला दिला.

क्रांती रेडकर हिचे मुख्यमंत्र्याना पत्र

तिने पत्रात म्हटले आहे, मी लहानपणापासून मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना पाहत लहानाची मोठी झाली आहे. मी एक मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊनच मी वाढले. कुणावर अन्याय करु नये आणि आपल्यावर होणारा अन्याय सहन तर मुळीच करु नये, हे या दोघांनी शिकवले. तोच धडा गिरवत आज मी एकटीने माझ्या खासगी जीवनावर हल्ला करणाऱ्या उपद्रवी लोकांविरोधात ठामपणे उभी आहे. लढते आहे. 

सोशल मीडिया, त्यावरचे लोक फक्त मजा बघत आहेत. मी एक कलाकर आहे. राजकारण मला कळत नाही. आमचा काहीही संबंध नाही. मला त्यात पडायचे नाही. आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमची बदनामी करण्यात येत आहे. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीचा टीका करुन खेळ करण्यात येत आहे. माझ्यावर होणारे खासगी हल्ले बाळासाहेब ठाकरे यांनी खपवून घेतले नसते. मला खात्री आहे. मला न्याय मिळेल. माझ्यावर तुम्ही अन्याय होऊ देणार नाहीत. तुमच्याकडून मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. तुम्ही योग्य न्याय करा, असे तिने पत्रात म्हटले आहे.

यापुढेही समीर वानखेडे तपास करणार !

दरम्यान, ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास यापुढेही समीर वानखेडे हेच करणार असल्याची शक्यता आहे. एनसीबीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एनसीबीच्या पथकाकडून वानखेडे यांचीही चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत वानखेडे यांनी पूरक माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले.