मुलबाळ होत नसल्याने महिलेने उचललं धक्कादायक पाऊल

सत्य समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला

Updated: Nov 7, 2018, 08:34 PM IST
मुलबाळ होत नसल्याने महिलेने उचललं धक्कादायक पाऊल title=

सचिन गाड, मुंबई : लग्न होऊन २० वर्षं उलटली, तरी तिला मूलबाळ झालं नाही. त्यावरून नवरा सतत टोमणे मारायचा. या त्रासाला कंटाळलेल्या ४० वर्षीय महिलेनं जे केलं ते निव्वळ धक्कादायक होतं.

सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या पार्वती विश्वकर्मा या महिलेने सनी नावाच्या एका दोन वर्षीय मुलाचं अपहरण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. रविवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्रतीक्षालयातून तिनं सनीचं अपहरण केलं. पण रेल्वे पोलिसांनी तत्काळ हालचाली केल्या आणि अवघ्या २४ तासात सनीला शोधून काढलं. तिनं सनीचं अपहरण का केलं, याचा उलगडा झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला...

मूळची बिहारची असलेली पार्वती नालासोपाऱ्याला राहते. तिच्या लग्नाला २० वर्षं झालीत. पण तिला अजून मूलबाळ झालेलं नाही. मूल न झाल्यानं नवरा तिला सतत टोमणे मारायचा. त्यामुळं त्रासलेल्या पार्वतीनं मूल चोरण्याचा निर्णय घेतला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात तिची नजर एका चिमुरड्यावर पडली. रात्रीच्या वेळी मुलाच्या आईचा डोळा लागला होता. त्याचाच फायदा घेऊन सनीला पळवून पार्वती पसार झाली.

सनीच्या आईनं म्हणजे विमल रणदिवेंनी जीआरपीमध्ये गुन्हा दाखल केला. पार्वतीची कोणतीही ओळख नसताना, अवघ्या २४ तासात रेल्वे पोलिसांनी नालासोपाऱ्यातून सनीला शोधून काढलं. तब्बल ६०० हून अधिक रिक्षाचालकांची चौकशी केल्यानंतर पोलीस पार्वतीपर्यंत पोहोचू शकले.

निसर्गानं मातृत्वाचं दान पदरात न टाकल्यानं पार्वतीवर मुलाचं अपहरण करण्याची वेळ आली. तिच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करायची की, दुसऱ्याचं मूल पळवल्याबद्दल तिला शिक्षा करायची? सांगणं खरंच अवघड आहे.