'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा

Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारतीय संघासाठी टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. असं असतानाच विराट आणि रोहितची कामगिरी चिंतेचा विषय ठरतोय.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 20, 2024, 12:40 PM IST
'...तर तोंडावर पडाल'; विराट-रोहितचा उल्लेख करत Border-Gavaskar Trophy आधी सूचक इशारा title=
विराट आणि रोहितचा उल्लेख करत केलं विधान

Border Gavaskar Trophy Rohit Sharma Virat Kohli: भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कामगिरीबद्दल सध्या क्रिकेट चाहत्यांबरोबरच तज्ज्ञांमध्येही बरीच चर्चा आहे. बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धा 22 नोव्हेंबरपासून सुरु होत असतानाच या रोहित, विराटच्या कामगिरीमधील सातत्याचा अभाव चिंतेचा विषय ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेतील सहा डावांमध्ये रोहित शर्माने 91 तर विराटचे 93 धावा केल्या. त्यामुळे टी-20 मधून निवृत्त झालेल्या विराट आणि रोहितचं कसोटी क्रिकेटमधील भवितव्य काय असेल याबद्दल विचार करण्याची गरज असल्याची चर्चा निवड समितीमध्ये झाल्याचे दावेही करण्यात आले. ही चर्चा एवढी जोरदार आहे की आता विराट आणि रोहितला अल्टीमेटम देण्यात आल्याचंही बोललं जात आहे.

रोहित संपलाय, विराट चांगला नाही म्हणतात ते...

मात्र ऑस्ट्रोलियाचा माजी क्रिकेटपटू मायकल हसीने विराट आणि रोहितच्या कामगिरीबद्दल चिंता वाटत नसून त्यांना लवकरच पूर्वीची लय गवसेल असं मत व्यक्त केलं आहे. हे दोघे संपले आहेत असं म्हणणं घाईचं ठरेल आणि असं म्हणणारे क्रिकेटतज्ज्ञ आणि कॉमेंट्री करणारे थक्क होतील अशी कामगिरी हे दोघे करतील असा विश्वास हसीने व्यक्त केला आहे. "अशाप्रकारे चॅम्पियन खेळाडूंबद्दल झालेली टीका आपण अनेकदा पाहिली आहे. अनेकजण आता रोहित संपलाय आणि विराट फारसा चांगला खेळत नाही असं म्हणत आहेत. मात्र ही विधान बावळटपणाची आहेत," असं सडेतोड विधान हसीने केलं आहे.

...तर तोंडावर पडाल

"ते दोघे फार मोठे खेळाडू आहेत. ते खेळाडू म्हणून फारच सरस आहेत. तुम्ही त्यांना असं हेटाळत असाल तर तुम्हीच तोंडावर पडाल यात शंका नाही. यामागील कारण म्हणजे ते लवकरच पुन्हा आधीसारखं उत्तम खेळू लागतील यात काहीच शंका नाही. ते फारच उच्च दर्जाचे खेळाडू आहेत हे विसरता कामा नये. त्यांना असं हेटाळणं मला वेडेपणाचं वाटतं. भारतीय संघालाही हलक्यात घेणं महागात पडू शकतं. नेमकं मी हे तुम्हाला शब्दांमध्ये सांगू शकत नाही," असं हसीने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितलं. 

रोहित पहिली कसोटी खेळणार नाही

रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे संघाबरोबर ऑस्ट्रेलियामधील या कसोटी दौऱ्यासाठी टीमबरोबर गेला नाही. रोहितची पत्नी ऋतिकाने नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून रोहित दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. याच कारणासाठी तो कुटुंबासोबत असून पहिली कसोटी खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. भारत या मालिकेमध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळणार आहे.