तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल

Mumbai-Goa Highway : कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईकर आपापल्या गावी रवाना झालेत.. मात्र त्यांच्यासमोर सर्वात मोठं विघ्नं उभं राहिलंय ते मुंबई गोवा हायवेचं.

राजीव कासले | Updated: Sep 6, 2024, 10:51 PM IST
तीन तासाच्या प्रवासासाठी 12 तास, गणपतीला कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे यावर्षीही हाल title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : गणपतीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे यंदाही हालच झाले. चिखल आणि खड्ड्यांच्या मुंबई गोवा हायवेवरुन (Mumbai-Goa Highway) प्रवास करण्याची वेळ पुन्हा एकदा चाकरमान्यांवर ओढवली. तासनतास चाकरमानी मुंबई-गोवा हायवेवर अडकून पडले होते. मुंबई माणगाव (Mumbai-Mangaon) हे तीन तांसाचे अंतर पार करण्यासाठी तब्बल 12 तास लागतायत. अरुंद रस्त्यांमुळे लोणेरे, तळेगाव, माणगावमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी होती. मुंबईहून गणपतीसाठी गावाला निघालेल्या चाकरमान्यांचा जीव मेटाकुटीला आला. खाण्या पिण्याचे प्रचंड हाल झाले.   

जे हाल मुंबई गोवा हायवेवर. तेच हाल कोकण रेल्वेतही झाले. गणेशोत्सवासाठी सोडलेल्या जादा गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं (Kokan Railway) वेळापत्रक कोलमडलं.. आणि त्याचा त्रास चाकरमान्यांनाच भोगावा लागला. कोकण रेल्वे असू दे किंवा मग मुंबई गोवा हायवे.. चाकरमान्यांचा दरवर्षीचा मनस्ताप ठरलेलाच आहे...   

मुंबई-गोवा महामार्ग अजून किती रखडपट्टी? 

मुंबई गोवा हायवेच्या रुंदीकरणाचं आणि विस्ताराचं काम 2010च्या अखेरीस सुरू करण्यात आलं. 2016ला काम पूर्ण होण्यासाठी डेडलाईन देण्यात आली. पण NGTची मान्यता, भूसंपादन आणि कंत्राटदारांच्या अडचणींमुळे काम रखडलं . 2022मध्ये दुसरा कंत्राटदार नेमण्यात आला. या अडथळ्यांमुळे महामार्ग 13 ते 14 वर्ष रखडला. 2016 च्या पहिली डेडलाईननंतर परत 2024ची डेडलाईन देण्यात आली. आता मुंबई गोवा हायवे पूर्ण व्हायला आता 2024 नाही तर 2026 उजाडणार अशी कबुली खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच दिलीय. याच रवींद्र चव्हाण यांनी गेल्या वर्षी मुंबई-गोवा हायवे पूर्ण क्षमतेनं सुरु करु असं आश्वासन दिलं होतं... मात्र त्यांचं आश्वासन हे अळवावरचं पाणीच ठरलं..   

वाहतूक कोंडीची ठिकाणे कोणती?  

कासू ते नागोठणे, वाकण ते कोलाड, इंदापूर, माणगाव आणि लोणेरे येथे महामार्गाची कामे अर्धवट  

इंदापूर, माणगाव येथे बाह्यवळण मार्गाचे काम रखडलं  

कंत्राटदार काम सोडून निघून गेल्याने बाह्यवळण रस्त्याची कामं अर्धवट अवस्थेत  

कोलाड, नागोठणे, लोणेरे येथे उड्डाणपुलांची कामे अपूर्णावस्थेत  

याच पट्ट्यात सातत्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावं लागतंय. 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून अवजड वाहतुकीला मुंबई-गोवा हायवेवर बंदी घालण्यात आली होती. मात्र हे बंदी आदेश झुगारून अवजड वाहनं रस्त्यावर आली. आणि त्याचाही फटका प्रवाशांना बसला. यंदाही मुंबई-गोवा हायवेवर खड्ड्यांची तीच समस्या कायम राहिली. चिखलाने भरलेल्या आणि खड्ड्यांनी चाळण झालेल्या मुंबई-गोवा हायवेवरुन चाकरमान्यांना गावची वाट धरायला लागली. आता मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यामागचं विघ्न कधी दूर होणार हे बाप्पालाच ठावूक.