मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कबड्डीची मॅच खेळता खेळता तरुण अचानक कोसळला आणि परत उठलाच नाही. तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तरुणाच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबईतल्या मालाड परिसरात महाविद्यालीय कबड्डीच्या स्पर्धा सुरू होत्या. 20 वर्षांचा किर्तीक राज हा आपल्या संघासह मैदानात उतरला. चढाई करत असताना विरोधी संघाने किर्तीकला घेरलं, यात तो मैदानावर कोसळला.
मुंबईतल्या मालाड इथल्या लव्ह गार्डन इथं मित्तल कॉलेजतर्फे कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. भर दुपारचे हे सामने सुरु होते. किर्तीक राजला मित्तल कॉलेजने आपल्या संघातून खेळण्यास बोलावलं होतं. मित्तल कॉलेजचा सामना आकाश कॉलेजशी रंगला होता. सामन्यात किर्तीकने चढाई केली, यावेळी आकाश कॉलेजच्या खेळाडूंनी त्याला घेरलं. यात किर्तीक खाली कोसळला. पण तो परत उठलाच नाही, त्याचा जागीच मृत्यू झाला. किर्तीकच्या मृत्यूचं कारण अदयाप स्पष्ट झालेलं नाही.
कबड्डी खेळताना तरुणाने गमावला प्राण, मुंबईतील धक्कादायक घटनेचा #Video आला समोर#Mumbai #Malad #Kabaddi pic.twitter.com/52ihwE3vtZ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 10, 2023
किर्तीक हा गोरेगावमधल्या संतोष नगर इथं राहात होता आणि विवेक कॉलमध्ये बी.कॉमच्या पहिल्या वर्षात शिकत होता. या प्रकरणी तपास सुरु आहे. कबड्डीचे सामने तात्काळ थांबवण्यात आले असून या स्पर्धेत आसपासच्या अनेक कॉलेज संघांनी सहभाग घेतला होता. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.