बागेश्री कानडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईत पुजारी गँगची दहशत वाढतेय का? असा प्रश्न पुढे येतोय. मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केलेला आरोपी कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीचा हस्तक असल्याचा आरोप आहे. नवी मुंबईतील एका व्यावसायिकाला दिवाळी भेटीच्या नावाखाली दहा लाख रुपयांच्या खंडणीचे फोन सुरेश पुजारीकडून येत होते. यासंदर्भात तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर पोलिसांनी रवींद्र पुजारीला नवी मुंबईतील कामोठे परिसरातून अटक केली.
पोलिसी खाक्या पाहाताच अटक आरोपींने मुंबई, ठाणे, नवी मुंबईतल्या २२ व्यावसायिकांची वैयक्तिक माहिती आणि मोबाईल क्रमांक खंडणीसाठी गॅंगस्टर सुरेश पुजारीने दिल्याचं समोर आलंय. मात्र हे व्यावसायिक तक्रारी साठी पुढे आलेले नाहीत, त्यामुळे आता पोलिसांनी नागरिकांनाच दबावाखाली न येता तक्रार करण्याचं आवाहन केलंय.
गँगस्टर सुरेश पुजारी सारखे गुंड परदेशात राहून मुंबईतील बेरोजगार आणि अशिक्षित तरुणांना हाताशी धरून मुंबईत खंडणीच्या नावाखाली दहशत पसरवण्याचा प्लॅन आखतायत. त्यामुळे त्यांचे हे प्लॅन उधळून लावण्यासाठी जेवढे पोलीस सज्ज आहेत तेवढंच नागरिकांनीही सजग राहणं गरजेचं आहे.