प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 10, 2024, 07:58 AM IST
प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाही title=
mumbai local train update central and harbour line megablock on sunday 10th august check timetable

Mumbai Local Mega Block: रविवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास तापदायक होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत लोकलच थांबणार नाहीयेत. त्यामुळं नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं अवाहन मध्य रेल्वेने केले आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताच ब्लॉक नसणार, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे हाती घेण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यावेळात माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. अशावेळी प्रवाशांनी घराहाबेर पडण्याअगोदर वेळापत्रक व मेगाब्लॉकच्या वेळा पाहा, असं अवाहन करण्यात येत आहे. 

कसे असेल मेगाब्लॉकचे वेळापत्रक?

माटुंगा- मुलुंडदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर 

वेळः सकाळी 11.05 ते 3.55 वाजेपर्यंत 

परिणामः ब्लॉक कालावधीत माटुंगा-मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. या लोकल शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांत थांबतील. 

या स्थानकात थांबा नाही 

नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांत लोकल थांबणार नाही. 

हार्बर मार्ग

सीएसएमटी-चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

वेळः सकाळी 11.10 ते संध्याकाळी 4.40 पर्यंत 

परिणामः ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तसंच, सीएसएमटी-गोरेवार/ वांद्रे अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. तर, ब्लॉक कालावधीत कुर्ला-पनवेलदरम्यान 20 मिनिटांच्या फरकाने विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत  सकाळी 10 ते संध्याकाळी 6पर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करता येणार आहे.