Mumbai Local Megablock: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर शनिवार किंवा रविवारी तुम्ही कुठे प्रवासाचं नियोजन करत असाल तर थांबा. कारण आज आणि उद्या रेल्वेने मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. आज शनिवारी पश्चिम रेल्वेवर तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसाकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं अवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर कसं असेल लोकलचे नियोजन, जाणून घ्या.
मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते 3.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते संध्याकाळी 4.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर स्थानकांदरम्यान अप आणि डाउन मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येतील. तर, ट्रान्सहार्बर मार्गावर पनवेल ते ठाणे अप आणि डाउन लोकल सेवा रद्द असतील. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी लोकल चालवण्यात येतील. ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील सेवा उपलब्ध असतील. तर बेलापूर, नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका असतील.
पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन मेगाब्लॉक असणार आहे. बोरीवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री 12 ते पहाटे 4.35 पर्यंत मेगाब्लॉक असेल. या काळात बोरीवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावरील सर्व लोकल विरार, वसई रोड ते बोरिवली, गोरेगाव दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. तसंच, रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसेल.