मुंबई हादरली! रात्री 3 वाजता Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं; नंतर केली आत्महत्या

Mumbai Crime News: पोलिसांना सकाळी 10 च्या सुमारास एका फोन कॉलवरुन गाळ्यामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता गाळ्याचा दरवाजा आतून बंद होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 22, 2024, 10:16 AM IST
मुंबई हादरली! रात्री 3 वाजता Ludo वरुन झालेल्या वादतून मित्राला संपवलं; नंतर केली आत्महत्या title=
कुर्ल्यामधील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News: मुंबईमधील साकीनाक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका तरुणाने आपल्याच मित्राची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र एकाने दुसऱ्याचा जीव घेऊन स्वत:चं आयुष्य संपवलं असं या दोघांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सध्या तरी सविस्तर घटनाक्रम समोर आला आहे.

नक्की कुठे घडला हा प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची हत्या करण्यात आली त्याचा आरोपीबरोबर काही कारणावरुन वाद झाला होता. बुधवारी पहाटेच्या सुमारास हा सारा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कुर्ल्यातील घास कम्पाऊंडमधील नवयुवक हाऊसिंग सोसासायटीमध्ये हा प्रकार घडला. सोसायटीमधील गाळा क्रमांक जी-9 मध्ये 55 वर्षीय गुलाल हमीद यांचा चिंधीपासून कपडे बनवण्याचा व्यवसाय आहे. या छोट्याश्या कारखान्याचा कारभार गुलाल हमीद हे त्याच्या मुलाच्या मदतीने पाहतात. कारखान्यामध्ये मदतनीस म्हणून गुलाल हमीद यांनी सद्दाम हुसेन रफी आलम या 27 वर्षीय तरुणाबरोबरच मोहम्मद अय्याज नवाब मलिक अहमद शेख (22) या दोघांना कामावर ठेवलं होतं. 

एक जण लटकलेल्या अवस्थेत दुसरा रक्ताच्या थारोळ्यात

नेहमीप्रमाणे काम संपल्यानंतर गुलाल हमीद आणि त्यांचा मुलगा घरी गेले. तर कामगार सद्दाम आलम आणि मोहम्मद अयाज शेख गाळ्यामध्येच झोपायचे. मंगळवारी रात्रीही असेच घडले. मात्र बुधवारी सकाळी 10 वाजता या जी-9 गाळ्यामध्ये एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एका व्यक्तीने पोलिसांना फोन करुन दिली. त्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस निरिक्षक गब्बाजी चिमटे हे त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर घटनास्थळी पोहोचले. मात्र गाळ्याचा दरवाजा बंद असल्याने पोलिसांनी तो तोडला आणि आत प्रवेश केला. समोर पाहिलं तेव्हा एका व्यक्तीने गळफास घेतला असून दुसरी व्यक्ती जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पोलिसांना आढळून आलं. दोघांचेही मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठले आहेत. 

3 ते 4 वाजण्याच्या सुमारस घडला हा प्रकार

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारस सद्दाम आणि मोहम्मद अय्याजमध्ये वाद झाला. रागाच्याभरात सद्दाने कात्रीने मोहम्मद अय्याजच्या गळ्यावर अनेक वार करुन त्याची हत्या केली. त्यानंतर सद्दामने गाळ्याच्या छताला फाशी लावून आत्महत्या केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून त्यांच्यात असा नेमका काय वाद झाला याचा शोध ते घेत असतानाच एक विचित्र प्राथमिक कारण समोर आलं आहे. साकीनाना पोलिसांनी 2 अपमृत्यूची नोंद केली असून मृत आरोपी सद्दाम विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. वादाचे मूळ कारण 'लुडो गेम' होता असं समजतं.

गेममुळे झाली हत्या

पोलीस निरीक्षक साबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आरोपी सद्दाम हा तापट स्वभावाचा होता. गावाकडील कौटुंबिक कलहामुळे तो तणावत होता. सद्दाम आणि मोहम्मद अयाज शेख हे दोघेही मंगळवारी रात्री बाहेरच जेवण करुन आले. नेहमीप्रमाणे ते गाळ्यात झोपण्यासाठी आले. रात्री झोपण्यापूर्वी ते दोघे मोबाईलवर 'लुडो गेम' खेळत होते. याचदरम्यान दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सद्दामने मोहम्मद अयाज शेखची हत्या केली.