मुंबई महापौर बंगल्यासाठी कुणी जागा देता का जागा?

महालक्ष्मी रेसकोर्सवरील १२ हजार स्क्वेअर फूट जागेला पसंती मिळण्याची शक्यता

Updated: Nov 30, 2018, 12:02 PM IST
मुंबई महापौर बंगल्यासाठी कुणी जागा देता का जागा? title=

मुंबई : मुंबईत नव्या महापौर बंगल्यासाठी पुन्हा जागेचा शोध सुरु झाला आहे. शिवाजी पार्कवरील महापालिकेच्या जिमखान्याच्या जागेवर नवा महापौर बंगला उभारायला विरोध दर्शवल्यानंतर पालिका प्रशासनाकडून महापौरांच्या नव्या बंगल्यासाठी पुन्हा नव्या जागेचा शोध सुरु झाला. यापूर्वी चर्चेत असलेली जागा आता नव्या महापौर बंगल्यासाठी निश्चित होऊ शकते. महालक्ष्मी रेसकोर्स जवळच्या १२ हजार स्क्वेअर मीटरच्या भूखंडावर नवा महापौर बंगला बांधता येईल का? याचा विचार सुरु आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स जवळचा हा भूखंड केशवराव खाडे मार्गावर आहे. मध्यवर्ती भागात असलेला हा भूखंड १२ हजार स्कवेअर मीटरचा... म्हणजे सध्याच्या शिवाजी पार्कच्या महापौर बंगल्यापेक्षाही मोठा आहे. सध्याचा महापौर बंगला हा ११ हजार ५५० स्केवअर मीटरच्या जागेत आहे.

याआधी राणीच्या बागेतील जागेचाही विचार

या अगोदर महापौर बंगल्यासाठी भायखळ्याच्या राणीच्या बागेतील अतिरिक्त आयुक्तांच्या निवासस्थानाचाही विचार करण्यात आला होता. राणीबागेतला हा बंगला १९३१ साली बांधला गेला. ब्रिटीशांनी मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा वापर कॅफेटेरीया म्हणून केला होता. त्या उद्देशानंच हा बंगला बांधण्यात आला. १९७४ पासून हा बंगला महापालिकेतल्या प्रशासकिय अधिकाऱ्यांचं निवासस्थान बनला. या बंगल्यात याआधी माजी अतिरीक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचं वास्तव्य होतं. बंगल्याच्या परिसराचं एकूण क्षेत्रफळ १७ हजार चौरस फुट इतकं आहे. तर बंगल्याचं बांधकाम ६ हजार चौ.फुट जागेवर आहे. बंगल्यात खाली चार वरच्या मजल्यावर चार अश्या एकूण आठ खोल्या आणि दोन हॉल (सभागृह) आहेत. मात्र, सध्याच्या शिवाजी पार्कवरच्या महापौर बंगल्यापेक्षा महापौरांच्या या नवीन संभाव्य निवास्थानाची शान अगदीच तोकडी आहे.

सद्य महापौर बंगल्याची वैशिष्ट्यं...

शिवाजी पार्क जवळचा महापौर बंगलाही खास आहे. तब्बल ४० हजार चौफूट एरियामध्ये हा बंगला पसरलाय. मालाडमधल्या खदानीतून आणलेल्या दगडासहीत राजस्थानी जोधपुरी बनावटीची ही वास्तू आहे. हेरिटेज ग्रेड २ प्रॉपर्टी, आलिशान ग्राउंड प्लस वन वास्तू, मागे समुद्रकिनारा, बंगल्याबाहेर विस्तीर्ण मोकळा प्रदेश, अद्ययावत सुरक्षा यंत्रणा, मोठे प्रवेशद्वार, वरच्या मजल्यावर ३ दालन, महापौरांचं २ बेडरूम्स निवासस्थान, एक अभ्यंगताच्या बैठकीची खोली. तळ मजल्यावर कॉन्फरन्स रूम, पोचखाना (हॉल), अभ्यंगताची खोली उजव्या बाजूला लिफ्ट आहे, अद्यायवत सोयी-सुविधा अशी या बंगल्याची वैशिष्ट्ये सांगता येतील. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी, अमिताभ बच्चन यांसारख्या दिग्गजांचा सहवास या वास्तूला लाभलेला आहे.