मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : मुंबईत आज सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने खऱ्या अर्थाने मुंबईत पावसाला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. कारण गेले काही दिवस पाऊस पडत होता. मात्र दुपारी ऊनदेखील पडत असल्याने उकाडा आणि घामाने मुंबईकरांचा पिच्छा काही सोडत नव्हता. मात्र आज सकाळपासूनच संततधार पाऊस पडत आहे. हवेत गारवा निर्माण झाला असून आल्हाददायक असं वातावरण निर्माण झालं आहे.
समुद्र किनारी मुंबईकरांची गर्दी
आल्हाददायक वातावरणात आणि हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर समुद्र किनारी गर्दी करू लागले आहेत. पावसाचा खरा आनंद मुंबईकरांना लुटता येत आहे. यामुळे मरीन लाईन्स, वरळी सी फेस, बँड स्टँड, जुहू बीच, वर्सोवा बीच अशा सर्वचठिकाणी मुंबईकर गर्दी करू लागले आहेत.
यावर्षी मुंबईत पावसाने उशीरा धडक मारली. जवळपास अर्धा जून महिना ओलांडला तरी काही पाहिजे तसा पाऊस मुंबईत पडला नाही. आज मात्र आता पावसाला खरी सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यात सर्वदूर पाऊस
मुंबई, ठाण्यासह कोकणात आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांतही पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र, काही ठिकाणीच तुरळक पाऊस पडू शकतो असा अंदाज आहे. राज्यभरात पुढील दोन ते तीन दिवस संपूर्ण कोकण विभागासह मुंबई, ठाणे परिसरात काही भागांत जोरदार सरींची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट विभाग आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.