Mumbai Crime News: कांदिवली येथे एक धक्कदायक घटना उघड आली आहे. कांदिवली पश्चिम एका सोसायटीबाहेरील नाल्यात 14 कुत्र्यांची हत्या करुन फेकण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, कुत्र्यांचे मृतदेह अत्यंत विदारक अवस्थेत सापडल्याने मृत्यूपूर्वी त्यांचे हाल करण्यात आले असावे, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या एका महिलेने या घटनेचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे.
कांदिवली पश्चिमेकडील मंगलमय इमारत परिसरात आणि सोसायटीमध्ये अनेक भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यांच्यासाठी सोसायटीतील काही रहिवाशी खाण्या-पिण्याची व्यवस्था करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यातील काही कुत्रे हे अचानक गायब झाले होते. त्यानंतर या कुत्र्यांचा शोधदेखील घेण्यात आला. हिना लिंबाचिया या त्या च सोसायटीतील रहिवाशी आहेत. त्यांना कुत्रे गायब झाल्याचे समजताच त्यांनी शोध सुरू केला. मात्र, अचानक सोसायटीलगतच्या नाल्यात काही गोण्या फेकून देण्यात आल्या होत्या. या गोण्यात कुत्र्याचे मृतदेह सापडले आहे.
स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि प्राणी क्रूरता प्रतिबंध कायद्यातील तरतूदींनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत कुत्र्यांचे मंगळवारी शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनाचे अहवाल समोर आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळू शकणार आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहेत. तसंच, या संदर्भात सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाल्या आहेत. हिना लिंबाचिया यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ पोस्ट केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कुत्र्यांचे पाय दोरीने बांधले होते. नंतरच त्यांची हत्या करण्यात आली, असं समोर येत आहे. तसंच, या हत्येमागे कुत्र्यांचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीचा हात असावा, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीचा सीसीटीव्हीच्या सहाय्याने शोध घेण्यात येत आहे. सीसीटीव्हीची तपासणी करण्यात येत आहे.