Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा

Mhada Lottery News : यंदाच्याच वर्षी संपणार म्हाडाच्या घराचा शोध... किफायतशीर दरात शहरात मिळवा हक्काचं घर. कोणकोणत्या भागात आहेत ही घरं? पाहून घ्या...   

सायली पाटील | Updated: Mar 28, 2024, 09:28 AM IST
Mhada Lottery News : मुंबईत म्हाडाची 1000 घरं; 'या' महिन्यात सोडत, डिपॉझिट तयार ठेवा  title=
mumbai news Mhada Lottery for 1000 homes in august 2024

Mhada Lottery News : सध्या राजकीय वर्तुळात मंत्री, नेतेमंडळी अतिशय सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत असून, यास निमित्त ठरतंय ते म्हणजे आगामी लोकसभा निवडणूक. देशाच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या नेतेमंडळी नागरिकांच्या घरांचा प्रश्नही सोडवताना दिसत आहे. घरांच्या प्रश्नावर तुम्हीही तोडगा शोधताय? हक्काचं घर शोधताय? म्हाडा तुम्हाला देणार आहे एक सुवर्णसंधी. 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेली आचारसंहिता संपल्यानंतर म्हाडाकडून आगामी सोडतीसाठीच्या तयारीला सुरुवात होणार आहे. ज्यानंतर या सोडतीची तारीख जाहीर करण्यात येईल. म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकतीच यंदाच्या वर्षी सोडतीत सहभागी करण्यात येणाऱ्या घरांची पाहणीसुद्धा केली. प्राथमिक स्तरावरील अंदाजानुसार मुंबई म्हाडाच्या अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटाकडून घरांची वाढती मागणी पाहता 2024 च्या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हाडाच्या तब्बल 1000 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. 

2019 ते 2022 दरम्यान मुंबई म्हाडाकडून कोणतीही नवी सोडत जाहीर करण्यात आली नव्हती. त्यानंतर 2023 मध्ये म्हाडानं 4082 घरांची सोडत काढली आणि सध्या याच सोडतीत विजेत्या ठरलेल्यांना घरांचं वितरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

म्हाडाच्या वतीनं आतापर्यंत विजेत्यांना 2800 घरांचा ताबा देण्यात आला असून, संपूर्ण रक्कम भरलेल्या विजेत्यांनाही घरं देण्यात येत आहेत. दरम्यान, 2023 च्या सोडतीतून जी घरं रिक्त राहतील त्या घरांचा समावेशही 2024 मधील सोडतीत करण्यात येणार आहे. जुन्या आणि नव्या प्रकल्पातील एकूण घरं जोडली असता हा आकडा 1000 वर पोहोचत आहे, ज्यासाठी यंदाच्याच ऑगस्ट महिन्यात सोडत निघणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

हेसुद्धा वाचा : Loksabha Election : अजित पवारांविरोधात विजय शिवतारेंची माघार? मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं? 

प्राथमिक अंदाजानुसार 2023 मधील सोडतीतून साधारम 600 घरं 2024 च्या सोडतीमध्ये जोडली जाऊ शकतात. त्यासोबतच गोरेगावमधील बांधकामाधीन प्रकल्पातील घरं, पवई, तुंगा, कन्नमवारनगर अशा ठिकाणच्या घरांचा समावेशही या सोडतीमध्ये असणार आहे. या घरांच्या दरांसंदर्भात अद्याप कोणतीही सविस्तर माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यामुळं म्हाडाच्या अधिकृत घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे.