मुंबई: कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या वाढदिवसानिमित्त फेसबुक पोस्ट टाकणाऱ्या टोळक्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यावेळी डोंगरी परिसरातून काही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. २६ डिसेंबरला दाऊदचा वाढदिवस असतो. या लोकांनी दाऊदच्या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी फेसबुकवर एक फोटो पोस्ट केला होता.
यामध्ये केक आणि दाऊदची छायाचित्रे होती. तसेच कॅप्शनमध्ये Happy Birthday Boss असा मजकूरही लिहण्यात आला होता. यानंतर डोंगरीत दाऊदच्या वाढदिवसाची पार्टीही झाल्याचे समजते. शेरा चिकणा याच्या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली होती. यामध्ये आणखी तिघांना टॅग करण्यात आले होते. ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली होती. अनेक व्हॉटसएप ग्रूपवरही ही पोस्ट पाठवण्यात आली होती. ही गोष्ट पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.
EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर
सध्या मुंबई पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या सगळ्यांचा दाऊदशी संबंध आहे किंवा नाही, याचा तपासही केला जात आहे.
मोदींच्या निर्णयाने डॉन दाऊद हादरला
उच्च न्यायालयातील वकील अजय श्रीवास्तव यांनी या पोस्टवर आक्षेप घेतला होता. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. एका दहशतवाद्याचा अशाप्रकारे वाढदिवस साजरा केल्याने समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही श्रीवास्तव यांनी सांगितले.