EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर

मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे.

Updated: Jul 7, 2019, 06:47 PM IST
EXCLUSIVE: २५ वर्षांमध्ये एवढा बदलला दाऊद, पाकिस्तानमधला फोटो समोर title=

मुंबई : मुंबईमध्ये १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २५ वर्षांपासून फरार आहे. पाकिस्तानमध्ये लपलेल्या दाऊदच्या प्रत्यर्पणाचा मुद्दा भारत नेहमी उचलतो. पण पाकिस्तान मात्र दाऊदला संरक्षण देत तो आपल्या देशात नसल्याचं सांगतं. पण यावेळी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या खोट्याचा बुरखा फाटला आहे. दाऊद इब्राहिमचा नवा फोटो गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला आहे.

दाऊद इब्राहिम डी नेटवर्कचं आंतरराष्ट्रीय नेटवर्क पाहणाऱ्या जाबिर मोतीवालला भेटतानाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये दाऊद ठणठणीत असल्याचं दिसत आहे. दाऊदच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार जाबिर मोतीवाला दाऊदच्या कराचीमधल्या क्लिफंटन हाऊसच्या जवळच राहतो.

जाबिर मोतीवाला याला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा एफबीआय ब्रिटनमधून मोतीवालाचं प्रत्यर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे. एफबीआयने दिलेल्या माहितीनुसार दाऊद कराचीमध्येच असल्याचं जाबिर मोतीवालने सांगतिलं आहे.

एफबीआयच्या माहितीनुसार जाबिर मोतीवाला दाऊदचा खास माणूस आहे. त्याच्याकडे दाऊद आणि त्याच्या नेटवर्कबद्दल खूप माहिती आहे. त्यामुळे भारतीय यंत्रणा जाबिर मोतीवालाच्या डी नेटवर्कबाबत आणखी माहिती मिळवण्यासाठी एफबीआयशी संपर्क करण्याच्या तयारीत आहे. दाऊदचं डी नेटवर्क आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांच्यात साटंलोटं आहे. मोतीवाला यामध्ये प्रमुख भूमिका बजावतो.

जाबिर मोतीवालाकडे युकेचा १० वर्षांचा विजा आहे. याचा कालावधी २०२८ साली संपणार आहे. पण मोतीवाला मागच्या काही महिन्यांपासून आपल्या कुटुंबासोबत एंटिग्वा आणि बर्मुडाचं नागरिकत्व घेण्याच्या तयारीत आहे. जाबिरने यासाठी दुबईच्या एका कंपनीमध्ये २ लाख अमेरिकी डॉलरही जमा केले होते. मोतीवाला याला लंडनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी मागच्या वर्षी १७ ऑगस्टला अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग आणि डी कंपनीच्या नार्कोटिक्स प्रकरणी मोतीवाला अटकेत होता.

या अटकेनंतर अमेरिकेने मोतीवालाच्या प्रत्यर्पणासाठी ब्रिटनकडे अपील केलं होतं. झी न्यूजकडे असलेल्या माहितीनुसार मोतीवालाच्या बचावासाठी लंडनमध्ये असलेलं पाकिस्तानचं उच्च आयोग पुढे आलं आहे. युकेच्या वेस्टमिंस्टर कोर्टात जजना दिलेल्या पत्रात मोतीवाला एक सन्मानित व्यावसायिक असल्याचं पाकिस्तान उच्च आयोगाने म्हणलं आहे. मोतीवालाचे डी कंपनीशी कोणतेही संबंध असल्याचं पाकिस्तान उच्च आयोगाने फेटाळून लावलं आहे.

डी कंपनीच्या नेटवर्कवर लक्ष ठेवणारा एक अधिकारी झी न्यूजशी बोलताना म्हणाला, 'मोतीवालाच्या अटकेमुळे पाकिस्तान घाबरलं आहे. जगासमोर पाकिस्तान दाऊदबद्दल खोटं ठरू शकतं. दाऊदची माहिती आम्हाला नसल्याचं पाकिस्तान वारंवार सांगतं. भारत सरकारनेही पाकिस्तानला दाऊदबद्दलचे पुरावे दिले आहेत, पण पाकिस्तान मानायला तयार नाही.'

एफबीआयच्या माहितीनुसार मोतीवाला अमेरिकेत फक्त ड्रग्जची तस्करी करत नाही, तर तो काळ्या पैशालाही पांढरं करण्यासाठी व्यवसायात वापरतो. मोतीवालाला अडकवण्यासाठी एफबीआयने त्याच्यासोबत हेरॉइनचा सौदा केला होता. तसंच मनी लॉन्ड्रिंगसाठीही एफबीआयने त्याची मदत मागितली होती. मोतीवाला अनेकवेळा पाकिस्तानमध्ये गेला आहे आणि त्याने तिकडे जाऊन दाऊदसोबत बैठका घेतल्या आहेत, असा दावा अमेरिका सरकारच्या वकिलांनी कोर्टात केला आहे.