तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलिसांचं अश्वदल सक्रीय होणार

१९३२ मध्ये हे दल बंद करण्यात आलं होतं. 

Updated: Jan 19, 2020, 05:11 PM IST
तब्बल ८८ वर्षांनंतर मुंबई पोलिसांचं अश्वदल सक्रीय होणार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : मुंबई पोलिसांकडे असणाऱ्या अनेक दलांमध्ये आता पुन्हा एकदा एका दलाची भर पडणार आहे. ही भर पडणार आहे असं म्हणण्यापेक्षा एक जुनं दल पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. पूर्वी मुंबईत पोलिसांकडे अश्वदल होतं. १९३२ मध्ये मात्र हे दल बंद करण्यात आलं होतं. आता जवळपास ८८ वर्षांनी हे अश्वदल पुन्हा एकदा सुरु होणार आहे. 

मुंबई पोलिसांच्या या युनिटमध्ये ३० घोडे असणार आहेत. पेट्रोलिंग आणि ट्राफिकसाठी वापर केला जाणार आहे. २६ जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनापासून हे युनिट सुरु होणार आहे. बृन्मुंबईच्या या माउंटेड पोलीस युनिटमध्ये १ सब इन्सपेक्टर, १ एएसआय, ४ हेडकॉन्स्टेबल, ३२ कॉन्स्टेबल असणार आहेत. त्याशिवाय जमावावर नियंत्रण करण्यासाठीही याचा वापर केला जाणार आहे. 

घोड्यावर बसल्याने उंचीवरुन जमावावर लक्ष ठेवणे सोपे जाते. हिंसक जमावावर नियंत्रणासाठी अश्वदल महत्त्वाचं ठरतं. मुंबईत मोठ्या प्रमाणात आंदोलन होतात, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे दल तयार करण्यात आलं आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. यावरुन कोणी लाठीचार्ज करणार नाहीये, पण घोडे आले की आपोआपच गर्दी बाजूला होते

अश्वदलात असणाऱ्या पोलिसांना / घोडेस्वारांना वॉकीटॉकी देण्यात येणार आहे. यांपैकी समुद्र किनारी दोन घोडे असतील. या घोडेस्वारांना बॉडी कॅमेरा दिला जाणार आहे. शिवाय मरोळमध्ये पागा तयार केल्या जाणार आहेत. सध्या दादरच्या शिवाजी पार्क येथे याची तात्पुरती सोय करण्यात आली आहे. 

वाचा : सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा

 

शिवाजी पार्क येथे २६ जानेवारीच्या परेडमध्ये या दलातील ११ घोडे असतील. ४-५ लाखांना या घोड्यांची खरेदी करण्यात आली आहे. आर. टी. निर्मल हे या दलाचे प्रशिक्षणाचे प्रमुख आहेत. आतापर्यंत यासाठी सरकारने १३ घोडे खरेदी केले आहेत, तर १७ घोड्यांची खरेदी येत्या काळात केली जाणार आहे.