Mumbai Police : फक्त उचकी लागली आणि थेट रक्ताची उलटी झाली... महिला हवालदाराच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ

Mumbai Police : महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या आकस्मिक मृत्यूने मुंबई पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. दिवसभर ड्युटीवर असताना पोलीस कर्मचाऱ्याला अचानक चक्कर आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Updated: Jan 17, 2023, 11:49 AM IST
Mumbai Police : फक्त उचकी लागली आणि थेट रक्ताची उलटी झाली... महिला हवालदाराच्या मृत्यूने पोलीस दलात खळबळ title=

Mumbai Police : कोरोनाच्या दोन वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेली 18वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा (Mumbai Marathon) गेल्या आठवड्यात मोठ्या उत्साहात पार पडली. मोठ्या संख्येने धावपटू या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. अनेकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. मात्र या स्पर्धेनंतर घडलेल्या घटनेमुळे मुंबई पोलिसांवर (Mumbai Police) शोककळा पसरली आहे. मुंबई मॅरेथॉन स्पर्धेनंतर आणखी एका ठिकाणी कर्तव्यावर असताना महिला पोलीस कर्मचाऱ्याचा झालेल्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

फोर्टमधील (Fort) हॉर्निमन सर्कलजवळ सुरक्षेसाठी कर्तव्यावर असलेल्या 46 वर्षीय पोलीस हवालदार नाईकचा रविवारी संध्याकाळी रक्ताच्या उलट्या झाल्याने मृत्यू झाला. कांचन भिसे (Kanchan Bhise) असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्या विशेष शाखेत तैनात होत्या. एका कार्यक्रमासाठी कर्तव्यावर असताना त्यांना चक्कर आली आणि त्या खाली पडल्या. त्यानंतर कांचन भिसे यांना रक्ताच्या उलट्या झाल्या. यानंतर तात्काळ तिथे उपस्थित असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी कांचन भिसे यांना तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. भिसे यांना आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कांचन भिसे या रविवारी सकाळी मुंबई मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान कर्तव्यावर होत्या. त्यानंतर संध्याकाळी एमआरए मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या इंडियन हेरिटेज सोसायटी यांच्या वतीने आयोजित मुंबई संस्कृती फेस्टिव्हल 2023 साठी बंदोबस्तादरम्यान काम पाहत होत्या. मात्र अचानक भिसे यांना उचकी आली. त्यानंतर भिसे यांना चक्कर आली आणि रक्ताची उलटी झाली. भिसे यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान कांचन भिसे यांचा मृत्यू झाला. अतिदक्षता विभागात कांचन भिसे यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना मृत घोषित करण्यात आले.

तो सेल्फी ठरला शेवटचा

मुंबई मॅरेथॉनचे आंतरराष्ट्रीय राजदूत आणि जमैकन ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता योहान ब्लेक यांच्यासोबत कांचन भिसे यांनी स्पर्धेदरम्यान एक सेल्फी काढला होता. मात्र भिसे यांचा तो शेवटचा सेल्फी ठरला आहे. कांचन भिसे यांच्या मृत्यूनंतर आता योहान ब्लेकसोबतचा हा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे कांचन भिसे यांच्या मृत्यूने कुटुंबासह पोलीस दलाला धक्का बसला आहे.