Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण...

Mumbai Rain Update: मुंबईत पावसामुळं नागरिकांची दाणादाण उडाली आहे. लोकल पकडताना एका महिलेचा अपघात झाला आहे. 

Updated: Jul 8, 2024, 11:14 AM IST
Mumbai Rain : लोकल पकडताना महिला पाय घसरुन रुळांवर पडली; अंगावरून ट्रेन गेली, जीव वाचला पण... title=
mumbai rain update Accident of woman while catching local on harbour line lost both legs Incident

स्वाती नाईक, झी मीडिया

Mumbai Rain Update: मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. पावसाचा लोकलवरही परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे रूळांवर पाणी साचल्याने ठप्प झाल्या आहेत. तर, पश्चिम रेल्वेही उशिराने धावत आहे. यामुळं प्रवाशांची तारांबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे. याच गर्दीमुळं एका महिला प्रवाशाचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे. 

पनवेलवरुन ठाण्याकडे जाणारी लोकल सकाळी नऊच्या दरम्यान बेलापूर सीबीडी रेल्वे स्थानकात आली. लोकल पकडण्याच्या प्रयत्नात एक महिला प्रवाशाचा पाय घसरला आणि ती रेल्वे रूळांवर पडली. यादरम्यान रेल्वेचा पहिला महिला डब्बा महिलेच्या अंगावरुन गेला. मात्र, प्रवाशांनी आरडा ओरडा केल्याने लगेचच मोटरमनने प्रसंगावधान राखत रेल्वे मागे घेतली. त्यामुळं सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. मात्र, या अपघातात महिलेला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. या अपघातामुळं प्रवाशी आणि रेल्वे प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती. 

रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ला, चुनाभट्टी परिसरात पाणी साचले आहे. त्यामुळे हार्बरवर अनेक रेल्वे उशिराने धावत होत्या. तर काही ट्रेन रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नागरिकांची कार्यालयात जाण्यासाठी धावपळ सुरू होती. यातच अनेक तासापासून बेलापूर वरून ठाण्याला जाण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडण्यासाठी गर्दी केली होती. 

रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली होती. याच गर्दीत लोकल पडकत असताना महीलेचा पाय घसरून ती रेल्वे रुळावरुन पडली. त्याचवेळी तिच्या अंगावरून रेल्वेचा पहिला डब्बा गेला. या अपघातात तिला दोन्ही पाय गमवावे लागले आहे. 

दरम्यान, पावसामुळं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाशी ते पनवेल लोकलसेवा हळहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, वाशी ते सीएसएमटी लोकलसेवा पूर्णपणे ठप्प आहे. वाशी ते ठाणे ही लोकलसेवा सुरू आहे. हर्बर लाईनचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडल्याने वाशी ते सीएसएमटी स्थानकादरम्यान नागरिकांचे हाल होत आहेत.

मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई शहर व उपनगरात आकाश अंशत: ढगाळ राहून अधूनमधून मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची  शक्यता आहे,   असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.