मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचं नाव राष्ट्रपतीपदासाठी चर्चेत आलंय. पवारांना राष्ट्रपतीपदावर बसवण्यासाठी शिवसेना मोर्चेबांधणी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. भाजप विरोधी पक्षांना एकत्र आणून शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचा उमेदवार करण्याची शिवसेनेची रणनीती असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
शिवसेना नेते संजय राऊत यांना याविषयी विचारलं असता, मला याबद्दल काही माहित नसल्याचं ते म्हणाले. मी अशा बातम्या वाचतोय. अजून त्या निवडणुकीला दोन-अडीच वर्ष आहेत, त्यासंदर्भात आत्ता बोलणं योग्य नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रात झालेला महाविकासआघाडीचा प्रयोग देशभरात करण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याकडून चाचपणी सुरु आहे. २०२२ साली राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराविरोधात शरद पवारांना उभं करुन, देशभरातल्या भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याची सुरुवात आतापासून केली तर २०२२ पर्यंत हे पक्ष एकत्र येतील, यासाठी शिवसेनेकडून कंबर कसली जात असल्याचं समजतंय.
शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याच्या रणनितीसाठी संजय राऊत यांनी देशातल्या इतर पक्षांच्या नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. यामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसकडे असलेली राजस्थान, मध्य प्रदेश ही राज्यं, केरळमधल्या कम्युनिस्ट सरकारसोबतही राऊत यांची चाचपणी सुरु आहे.
शरद पवारांचं नाव जर समोर आलं तर त्याला भाजप व्यतिरिक्त इतर पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा विश्वास संजय राऊत यांना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा प्रयोग देशपातळीवर राबवण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
राज्यात महाविकासआघाडीचं सरकार यायच्याआधी भाजपनेही शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं तर केंद्रात सुप्रिया सुळेंना मंत्रिपद आणि शरद पवारांना राष्ट्रपतीपद देऊ अशी ऑफर दिल्याचं वृत्त आलं होतं. शरद पवारांनी मात्र राष्ट्रपतीपदाची ऑफर झाल्याचं वृत्त फेटाळून लावलं होतं.