मुंबईतील 'या' प्राइम लोकेशनवर धावणार पॉड टॅक्सी; किती असेल भाडे, कधी सुरू होणार सेवा? वाचा

Pod Taxis In BKC: एमएमआरडीएच्या २८२व्या कार्यकारी समितीने बीकेसीतील पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी सवलतकाराच्या (कन्सेशनेअर) नियुक्तीला दिली मंजुरी

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 5, 2024, 10:08 AM IST
मुंबईतील 'या' प्राइम लोकेशनवर धावणार पॉड टॅक्सी; किती असेल भाडे, कधी सुरू होणार सेवा? वाचा title=
Mumbai to soon have driverless pod taxis in bkc check ticket fare

Pod Taxis In BKC: मुंबईकरांचा प्रवास सुलभ आणि सूकर व्हावा यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रकल्प राबवले जात आहे. लोकल अधिक आरामदायी व्हावी म्हणून रेल्वे प्रयत्न करत आहे. तसंच, शहरात मेट्रोचे जाळेही पसरवण्यात येत आहे. त्याचबरोबर आता शहरात पॉड टॅक्सीची सेवादेखील राबवण्यात येणार आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील ऑटोमेटेड रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम (पॉड टॅक्सी) प्रकल्पाचे डिझाइन, अभियांत्रिकी, विकास, बांधकाम, चाचणी, कार्यान्वयन तसेच ऑपरेशन व देखभाल सवलतकार (कन्सेशनेअर) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

पॉड टॅक्सीमुळं बीकेसीत दररोज प्रवास करणाऱ्या 4 ते 6 लाख लोकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. हा प्रकल्प बीकेसीमधील लास्ट माइल कनेक्टिव्हिटी क्रांतिकारी बदल घडवेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. पॉड टॅक्सी प्रणाली पूर्णपणे स्वयंचलित असून, ती १५ ते ३० सेकंदांच्या अंतराने चालवता येते. वांद्रे-कुर्ला संकुलाला वांद्रे आणि कुर्ला उपनगरीय स्थानकांशी जोडणाऱ्या अरुंद रस्त्यांसाठी ही प्रणाली अत्यंत योग्य आहे

कसं असेल भाडे?

पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या भाड्याची संरचना काटेकोरपणे करण्यात आली आहे. सध्या प्रवासी बीकेसीला वांद्रे किंवा कुर्ल्याहून रिक्षाने प्रवास करण्यासाठी प्रति किलोमीटर ₹१५.३३, तर शेअरिंग रिक्षासाठी प्रति प्रवासी ₹३० ते ₹४० देतात. तसेच, टॅक्सी वापरणाऱ्यांना प्रति किलोमीटर ₹१८.६७ भाडे द्यावे लागते, तर ओला आणि उबर चालक २-३ किलोमीटरच्या कमी अंतराच्या प्रवासासाठी ₹८० ते ₹१००दरम्यान भाडे आकारतात. सर्वेक्षणात असे आढळले की सुमारे ७०% रिक्षाप्रवासी आणि ३६% बसप्रवासी पॉड टॅक्सी सेवेसाठी प्रति किलोमीटर ₹२१ इतके भाडे देण्यास तयार आहेत. त्याचप्रमाणे, टीईएफएस अभ्यासानुसार प्रति किलोमीटर ₹२१ इतक्या भाड्याची शिफारस करण्यात आहे. तसेच महागाई आणि ऑपरेशनल खर्च लक्षात घेऊन दर वर्षी ४% वाढीचा प्रस्ताव दिला आहे.

पॉड टॅक्सी प्रकल्पाचा अंदाजित खर्च ₹१०१६.३४ कोटी आहे. 3 वर्षात सार्वजनिक, खासगी, भागिदारी (पीपीपी) तत्वावर प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. वांद्रे ते कुर्ला मार्गावर 2027मध्ये पॉड टॅक्सी धावण्याची शक्यता आहे. पॉड टॅक्सीचा वेग 40 किमी प्रतितास इतका असून एका टॅक्सीत 6 प्रवासी वाहून नेण्याची शक्यता आहे. तसंच, सध्या 38 स्थानके असणार आहेत.