Mumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Mumbai Univeresity CDOE Admission: विस्तारीत वेळापत्रकानुसार आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.

Pravin Dabholkar | Updated: Sep 30, 2024, 06:54 PM IST
Mumbai University: दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या अभ्यासक्रमांसाठी 'या' तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश title=
दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्र अभ्यासक्रम प्रवेश

Mumbai Univeresity CDOE Admission: मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या (सीडीओई) पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात आली आहे. विस्तारीत वेळापत्रकानुसार आता 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत या सर्व अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे.दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचे प्रवेश हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केले जात आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठी एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (ऍडव्हान्स अकाउंटन्सी), एम. कॉम. (बिझनेस मॅनेजमेंट) एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज https://mucdoeadm.samarth.edu.in/    या संकेतस्थळावरून भरता येतील. त्याचबरोबर एमसीए आणि एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसही 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी एमसीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना ईमेल द्वारे प्रवेशासाठी लिंक पाठविण्यात आली आहे. तसेच पोस्ट ग्रॅज्युअट डिप्लोमा इन फायन्साशिअल मॅनेजमेंट (सत्र1 आणि 2) च्या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसही मुदतवाढ देण्यात आली आहे.  

पुढील वेबसाइट्सवर मिळेल माहिती

पदव्युत्तर प्रथम आणि द्वितीय वर्षासाठीचे एम.ए. (शिक्षणशास्त्र) चे प्रवेश आणि द्वितीय वर्ष एम.ए. (इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, संज्ञापन आणि पत्रकारिता, जनसंपर्क); एम. कॉम. (अकाऊंट/ मॅनेजमेंट), एम.एस्सी. (गणित) एम.एस्सी. (माहिती तंत्रज्ञान), एम.एस्सी. (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/    या संकेतस्थळावरून भरता येतील. पदवीच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष बीए. बीकॉम, बीकॉम (अकाऊंट अँड फायनान्स), बीएस्सी (माहिती तंत्रज्ञान), बीएस्सी (संगणकशास्त्र) या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज - https://idoloa.digitaluniversity.ac/   या संकेतस्थळावरून भरता येतील. या सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रीयेसंबधातील सर्व तपशील विद्यापीठाच्या https://mu.ac.in/distance-open-learning/    या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन 

ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणींमुळे आपले महाविद्यालयीन शिक्षण औपचारिक शिक्षणपद्धतीतून पूर्ण करता येत नाही अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठामार्फत चालविण्यात येत असलेल्या विविध अभ्यासक्रमांची दालने खुली करून देणे हा संस्थेचा मुख्य उद्देश्य आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना नियमित महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दूरस्थ व ऑनलाइन शिक्षण प्रणाली हा एक योग्य पर्याय असून, यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा असे आवाहन सीडीओईचे संचालक प्रा. शिवाजी सरगर यांनी केले आहे.

लवकरच विभागीय केंद्र

सीडीओईचे चर्चगेट, ठाणे, कल्याण, रत्नागिरी व सावंतवाडी येथे विभागीय केंद्रे असून या ठिकाणी प्रवेशासंबंधी मार्गदर्शन व अध्ययन साहित्याचे वितरण केले जाते. नजीकच्या काळात पालघर येथेही लवकरच विभागीय केंद्र सुरु होणार आहे.