Mumbai University: आयडॉलमध्ये करता येणार एमएमस, एमसीए; युजीसीकडून मिळाली मान्यता

Mumbai University Course: या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jun 23, 2023, 07:40 PM IST
Mumbai University: आयडॉलमध्ये करता येणार एमएमस, एमसीए; युजीसीकडून मिळाली मान्यता title=

IDOL Course : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन (आयडॉल) संस्थेमधून विद्यार्थ्यांना आता एमएमएस आणि एमसीए कोर्स करता येणार आहे. या अभ्यासक्रमास एआयसीटीई आणि युजीसीने मान्यता दिली आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरू करण्यात येतील. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे. 

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षांसाठी  एआयसीटीई व यूजीसीने आयडॉलला मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमासाठी ७२० जागांची मान्यता दिली असून हा अभ्यासक्रम आयडॉलमधून दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून सुरु आहे. हा अभ्यासक्रम एमबीए या अभ्यासक्रमाच्या समकक्ष आहे. तसेच आयडॉलमध्ये मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन  (एमसीए ) हा दोन वर्षाचा सुधारित अभ्यासक्रम आहे. यापूर्वी हा अभ्यासक्रम तीन वर्षाचा होता. या अभ्यासक्रमाला एआयसीटीई व यूजीसीने २०००  जागांची मान्यता दिली आहे. युजीसीच्या मान्यतेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी , प्रकुलगुरु डॉ. अजय भामरे, कुलसचिव डॉ सुनील भिरूड यांनी विशेष प्रयत्न केले. 

मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एमएमएस) या अभ्यासक्रमामध्ये फायनान्स, मार्केटींग व ह्युमन रिसोर्स हे तीन स्पेशलायझेशन विषय आयडॉलने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या अभ्यासक्रमाचे अध्ययन साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. 
एमएमएसचे  दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना असायनमेंट, प्रोजेक्ट असणार आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासकेंद्रामधून प्रत्यक्ष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शनही केले जाणार आहे. या एमएमएस अभ्यासक्रमाच्या  प्रवेशासाठी आयडॉल स्वतंत्र 'प्रवेश परीक्षा' घेणार आहे असे आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर यांनी सांगितले.

नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व ज्यांना नियमित एमएमएस व एमसीए करता येत नसेल त्यांना मुंबई विद्यापीठाने दूरस्थ माध्यमातून आयडॉलमधून शिक्षणाची एक संधी दिली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे,अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली.