मुंबई : केंद्रातील भाजप सरकारने दिल्लीत कोकणातील राजापूर येथील नाणार प्रकल्पाबाबत अंतिम करार केला. कोणाच्याही विरोधाला न जुमानता भाजपने हा प्रकल्प रेटलाय. यावरुन शिवसेना अधिकच संतप्त झालेय. आता माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक खासदार नारायण राणे हे आक्रमक झाले आहेत. वेळ पडल्यास राजीनामा फेकून देईन आणि नाणारला एकही दगड रचू देणार नाही, अशा इशारा राणे यांनी दिला आहे
आपला याआधी नाणार प्रकल्पाला विरोध होता आणि यापुढेही राहील. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, वेळ पडल्यास फक्त शिवसेनेप्रमाणे धमकी देणार नाही तर खासदारकीचा राजीनामा फेकून देईन, असे राणेंनी म्हटलं आहे. रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्यावतीने ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. नवी दिल्लीत यावर केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री यांची भेट नाकारली. उद्धव ठाकरे यांनी करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर भेट कशासाठी अशी विचारणा करत भेट नाकारली.