नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पेटला, शिवसेनेनं दिलं रोखठोख उत्तर

महाराष्ट्रात जनआशिर्वाद यात्रा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून नारायण राणे सातत्याने शिवसेनेवर निशाणा साधत आहेत  

Updated: Aug 23, 2021, 11:02 PM IST
नारायण राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा वाद पेटला, शिवसेनेनं दिलं रोखठोख उत्तर title=

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद आता चांगलाच पेटला आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणावर बोलताना नारायण राणे यांनी 'मी उपस्थित असतो तर कानाखाली चढवली असती' असं वक्तव्य केलं होतं. आता शिवसेनेनं नारायण राणे यांना जशास तसं उत्तर दिलं आहे.

'अशी वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद'

“स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. पण एक लक्षात ठेवावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर कोणतेही नेते असतील, त्यांच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटण्याची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये”, असा इशारा विनायक राऊत यांनी दिला आहे.

'शिवसेनेवर टीका करणं ही त्यांची रोजीरोटी'

नारायण राणे ज्याप्रकारे सातत्याने टीका करत आहेत, शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर त्यातून एक दिसतय, जोपर्यंत ते शिवसेनेवर टीका करतायत तोपर्यंतच त्यांच्या वक्तव्याला महत्त्व दिलं जात आहे, त्यामुळे मी त्यांना आव्हान देते की एक महिनाभर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका न करता राहून दाखवावं, असं शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. शिवसेनेवर टीका करणं हीच त्यांची रोजरोटी असल्याचा टोलाही निलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.