Nawab Malik Attacks NCB: जावयाला खोट्या ड्रग्स प्रकरणात अडवलं, नवाब मलिक यांचा आरोप

जावयाला अटक झाली त्यावरून मलिक यांची मळमळ जाणवते, भाजपने लगावला टोला

Updated: Oct 14, 2021, 03:18 PM IST
Nawab Malik Attacks NCB: जावयाला खोट्या ड्रग्स प्रकरणात अडवलं, नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत भाजप (BJP) आणि एनसीबीवर (NCB) निशाणा साधला. माझ्यावर अनेक प्रकारचे राजकीय हल्ले होत आहेत, माझा जावई समीर खान (Sameer Khan) ड्रग डीलर (Durg Pedlar) असल्याचं भाजपचे लोक पसरवत आहे, एनसीबीने समीर खानला ड्रग्स प्रकरणात गोवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. जेव्हापासून मनीष भानूशाली आणि त्याचा भाजपशी असलेल्या संबंधांचा मुद्दा उपस्थित केला आहे, तेव्हापासून भाजप माझ्यावर हल्ला करत आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आह.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये (Bollywood) सुरु झालेल्या ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीदरम्यान नवाब मलिक यांचे जावई समीर खानला एनसीबीने अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच समीर खान यांना जामिन मिळाला. जानेवारीत शाहिस्त फर्नीचरवाला हिला अटक केल्यानतंर दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, बंगळुरु आणि मुंबईत मुच्छड पानवाला यांच्यावर छापे टाकण्यात आले. रामपूरमध्येही छापा टाकण्यात आला. याचा संबंध समीर खानशी जोडण्यात आला असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. 

समीर खानला फसवण्यात आलं

नवाव मलिक यांनी म्हटलं, माझ्या जावयाला फसवण्यात आलं आहे. एनसीबीने छाप्यात 200 किलो गांजा जप्त करण्यात आला, असं सांगण्यात आलं, पण प्रत्यक्षात साहिस्ता फर्नीचरवाला हिच्याकडे साडेसात ग्रॅम गांजा सापडला. सीएचा अहवाल आला आहे, त्यात म्हटलं आहे, सापडलेली गोष्ट हर्बल तंबाखू आहे. 
त्यामुळे सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो की इतकी मोठी एजन्सी असलेल्या NCB ला तंबाखू आणि गांजा मध्ये फरक कळत नाही, हे आश्चर्य आहे असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे. त्यांच्याकडे टेस्ट किट असते त्यात ते लगेच टेस्ट करून ते ड्रग आहे का हे तपासू शकतात, पण गांजा नसताना यांना अडकवले असे कोर्टाच्या आदेशात म्हटले आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

एनसीबीने टाळाटाळ केली

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी एका प्रेस रिलीज केली आणि एका मोबाईल नंबरवरुन चार फोटो मीडिया दिले गेले. 9 जानेवारी रोजी एका महिलेकडून सात ग्रॅम गांजा पकडला, त्या महिलेला जामीन दिला. 13 जानेवारीला मला एक फोन आला तुमच्या जावयाला ड्रग प्रकरणी समन्स आले का? 12 जानेवारीला समीरला त्याच्या आईच्या घरी समन्स आलं. त्याला 13 तारखेला 10.30 वाजता समन्स पाठवलं, तो 10 वाजता एनसीबी कार्यालयात हजर झाला. मग बातम्या आल्या समीर खान ड्रग पेडलर आहे, त्याला अटक झाली आम्ही जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. अटकेनंतर 6 महिन्यांनी एनसीबीने चार्जशीट दाखल करतो म्हणून सागितले. साडे तीन महिने एनसीबीने टाळाटाळ केली. त्यानंतर जामीन झाला असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक यांची मळमळ जाणवते

नवाब मलिक यांनी भाजप आणि एनसीबीवर केलेल्या आरोपांना भाजपने उत्तर दिलं आहे. नवाब मलिक प्रवक्ते आहेत की वक्ते, ते प्रकरण कोर्टात असताना त्यावर मत मांडणं चुकीच असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. जावयाला अटक झाली त्यावरून मलिक यांची मळमळ जाणवते, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. 

एनसीबी कारवाई चुकीची वारंवार सांगणे म्हणजे व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणं, जावयाला अटक योग्य होती हे मान्य न करता यंत्रणेवर दबाव वाढवण्याचे काम नवाब मलिक करत आहे असा आरोप दरेकर यांनी केला आहे. आपल्या देशात यंत्रणा स्थापित केल्या, अन्याय झाला तर वेगळ्या फोरमवर न्याय मागता येते तिथ नवाब मलिक खुल्या पद्धतीने तिथ न्याय मागावे, न्यायाधीश असल्या प्रमाणेच मलिक बोलतात अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे.