मुंबई : मुंबई एनसीबीचे zonal director समीर वानखेडे (NCB Zonal Director Sameer Wankhede) यांनी आर्यन खान प्रकरणीच्या मुद्द्यावरुन मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्र पोलीस संचालनालयाकडे त्यांनी याबाबतची तक्रार करत सदर प्रकरणीचे सीसीटीव्ही फूटेजही पाठवल्याचं म्हटलं जात आहे. डीजीपींना दिलेल्या तपशीलानुसार पोलिस अधिकारी आपला सिव्हील ड्रेसमध्ये पाठलाग करत असल्याची तक्रार त्यांनी केली आहे. (Aryan khan, NCB, Sameer wankhede)
ड्रग्ज रॅकेटविरोधात समीर वानखेडेंची मोठी मोहिम
किंग खान म्हणून नावाजलेल्या शाहरुख खान याच्या मुलाला म्हणजेच आर्यन खान याला ताब्यात घेण्याचं काम वानखेडे यांनीच केलं होतं. याशिवायही कला जगतातील ड्रग्ज प्रकरण त्यांनी वेळोवेळी उघड केलं आहे. एक शिस्तप्रिय अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची ओळख आहे. पण, आता मात्र आर्यन खान प्रकरणाचा तपास सुरु असताना मुंबई पोलिसांकडूनच त्यांच्या कारवाईत अडथळे निर्माण केले जात असल्याचं म्हटलं जात आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून आले होते चर्चेत...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला जोडूनच तपास सुरु असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी तपास आणि कारवाई दरम्यान वानखेडे प्रकाशझोतात आले होते. त्याचवेळी त्यांची एनसीबीमध्ये एंट्री झाली होती. त्यांच्या हाती महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं होतं.
समीर वानखेडे 2008 बॅचचे अधिकारी असून, एनसीबीमध्ये सेवेत येण्यापूर्वी ते नॅशनल इन्वेस्टिगेशन एजंन्सीमध्ये सेवेत होते. एअर इंटेलिजन्स युनिटसोबतही त्यांनी काम केलं आहे. आतापर्यंत त्यांना अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अशा परिस्थितीत सुरक्षा पुरवण्याच्या सुविधेला मात्र वानखेडे यांनी नकार दिल्याचंही म्हटलं जातं.