ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत

कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. 

Updated: Sep 7, 2020, 08:31 PM IST
ड्रग प्रकरणी एनसीबीने कंगनाची चौकशी करावी- सचिन सावंत title=

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने स्वतःच ड्रग घेत असल्याची एका व्हिडिओमध्ये कबुली दिली आहे. कंगना मित्रांनाही ड्रग्जसाठी जबदरस्ती करत होती अशी विधाने व काही व्हिडिओच्या माध्यमातूनही स्पष्ट होत आहे. या सर्वांची दखल घेत नार्कोटिक्स विभागाने कंगनाची ड्रग्जसंदर्भात चौकशी केली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत पुढे म्हणाले की, कंगना राणौतसारख्या व्यक्तीची तुलना भाजपाचे "झांसे के राजा' आमदार राम कदम यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी केली. इतिहासात झाशीच्या राणीचा एवढा मोठा घोर अपमान करण्याची कोणी हिंमत दाखवली नाही. त्याबद्दल भाजपाने देशाच्या जनतेची माफी मागितली पाहिजे. कंगनाची पाठराखण करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर भाजपाने कारवाईही केलेली नाही. ते विधान राम कदम यांचे वैयक्तिक आहे असे म्हणून जबाबदारी झटकण्याचे काम केले आहे. तसेच कंगनाच्या विधानाशी सहमत नसल्याची सारवासारव भाजपाने केली पण त्यांनी तिच्या विधानाचा साधा निषेधही केलेला नाही.

मुंबई व महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या मुंबई पोलीसांना माफीया म्हणणाऱ्या कंगनाला केंद्रातील मोदी सरकारने तत्काळ वाय दर्जाची सुरक्षा दिली, यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. भाजपा नेहमीच त्यांच्या हिताचा अजेंडा चालवणाऱ्या व्यक्तींना संरक्षण देते. देशात भाजपाच्या संरक्षणात विवाद उत्पन्न करणारे व विरोधी पक्षाच्या सरकारांची बदनामी करणारे अनेकजण नियुक्त केले आहेत. कंगनाचे बोलवते धनी भाजपा नेते आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. मुंबईचा व महाराष्ट्राचा कंगनाने केलेला अपमान भाजपाच्या इशाऱ्यावर होता, असेही सावंत म्हणाले.