अजित पवार यांनी खरंच शेती करण्याचा निर्णय घेतला होता का?

 अजित पवार आता कशाची शेती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. 

Updated: Sep 28, 2019, 09:04 PM IST
अजित पवार यांनी खरंच शेती करण्याचा निर्णय घेतला होता का? title=
Pic Courtesy: Ajit Pawar Facebook Wall

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा देताना शेती करू असे पार्थ पवारांना सांगितले होते. तशी माहिती खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अर्थात अजित पवारांचे काका. अजित पवारांच्या या कथित वक्तव्याची सगळ्यांनीच दखल घेतली. अजित पवार आता कशाची शेती करणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण या चर्चेवर शेवटी अजित पवारांनीच पडदा टाकला.

अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर ते आता काय करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. शरद पवारांनी तर त्याचं उत्तरही दिलं होतं अजित पवारांनी पार्थ पवारांना आपण शेती किंवा धंदा करु असं सांगितलं होतं. शरद पवारांनी अजित पवारांबाबत जे सांगितलं त्याचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. उद्धव ठाकरेंनी याच वक्तव्याचा धागा पकडत मी शेती करणार नाही पण महाराष्ट्राचा मुख्यमंत्री नक्की निवडीन असा निर्धार व्यक्त केला.

कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीही अजित पवारांच्या या कथित वक्तव्यावर भाष्य करण्याची संधी सोडली नाही. त्यांनीही अजित पवारांना शालजोडीतले लगावले. अजित पवारांच्या शेती करण्याच्या इच्छेवर खासदार संजय काकडेंचा विश्वास बसला नाही. अजित पवार स्वतःचा वेगळा पक्ष काढतील पण राजकारण सोडणार नाहीत असं काकडेंनी सांगितले. 

अजित पवारांनी मात्र २४ तासानंतर त्यांच्या कथित वक्तव्यावर घूमजाव केले आहे. अजित पवार येत्या काळात शेती करणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं असलं तरी शेतीबाबत वक्तव्य करून अजित पवार भविष्यातल्या राजकारणासाठी मशागत केली हे मात्र तेवढंच खरं.