अश्लील लावणीचा तडका... राष्ट्रवादीचा भडका, कधी थांबणार हा विकृत धांगडधिंगा?

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स प्रकार, अश्लील डान्सच्या कार्यक्रमांचं आयोजन करू नका... अजित पवार यांनी काढलं फर्मान

Updated: Feb 8, 2023, 08:35 PM IST
अश्लील लावणीचा तडका... राष्ट्रवादीचा भडका, कधी थांबणार हा विकृत धांगडधिंगा?

NCP on Lavani : अश्लील हावभाव... अश्लील इशारे... विकृत चाळे... याला लावणी तरी कशी म्हणायची...? सबसे कातिल, गौतमी पाटील... (Gautami Patil) अशी ओळख असलेली ही लावणी स्टार... ती आणि तिच्यासारख्या अनेकजणींनी गावागावातल्या पोराटोरांना पागल केलंय... येडं की खुळं करून टाकलंय... जत्रा असो, नाहीतर राजकीय कार्यक्रम... लावणीच्या कार्यक्रमांना मागणी वाढलीय. मात्र हजारो रुपयांची बिदागी घेऊन जाहीरपणे अश्लील डान्सचं प्रदर्शन सुरू आहे. तरुण पिढीला बिघडवून टाकणाऱ्या अशा अश्लील लावणी डान्सरना चाप बसावा, यासाठी अस्सल लावणी कलावंतांनीच आता आवाज बुलंद केलाय...

मेधा घाडगे यांनी उचलला मुद्दा
राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या बैठकीत अभिनेत्री मेधा घाडगे (Medha Ghadge) यांनी या मुद्याला वाचा फोडली आहे. लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स प्रकार वाढू लागलेत, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या वतीनंही अशा अश्लील लावणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, याकडं त्यांनी लक्ष वेधलं. तेव्हा अश्लील डान्सच्या कार्यक्रमांचं आयोजन करू नका, असं फर्मानच अजित पवारांनी (Ajit Pawar) काढलं.लावणी कार्यक्रमांसाठी सेन्सॉर सुरू करण्याची मागणीही त्यांनी केलीय.

गौतमी पाटीलच्या गोंधळ
पुणे जिल्ह्यातील खेड (Khed) तालुक्यातील बहिरवाडी गावात काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी तुफान गर्दी झाली होती. यावेळी तरुणांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तरुणांनी हुल्लडबाजी सुरु केल्याने काही वेळासाठी कार्यक्रम थांबवावा लागला. कार्यक्रम नीट पार पडावा यासाठी गावातील महिलांवर हातात काठ्या घेऊन उभे राहण्याची वेळ आली. काही वेळाने परिस्थिती शांत झाल्यानंतर गौतमी पाटीलने पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात केली.

लावणी कला ही महाराष्ट्राची परंपरा आहे... लोककलेचा सांस्कृतिक वारसा आहे. मराठी मातीतल्या अस्सल लावणी कलावंतांनी आपला घाम गाळून हा वारसा जपलाय... त्याला अश्लील नृत्याचा लागलेला डाग लवकरात लवकर पुसायला हवा... आणि विकृत हावभावांच्या बाजारूपणाला चाप लागायलाच हवा..