Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने (Death threat to Sharad Pawar) एकच खळबळ उडाली होती. पवारांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीनं फोन केला होता. हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी (Maharashtra Political News) तात्काळ धमकी देणाऱ्या व्यक्तीच शोध सुरु केला.
धमकी देणाऱ्याला अटक
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावरील ऑपरेटरने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधून एका व्यक्तीला अटक केली. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव नारायण कुमार सोनी असं आहे.
पत्नी पळून गेल्याने पवारांना फोन
आरोपी नारायण कुमार सोनी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नारायण सोनी हा दहा वर्ष पुण्यात राहिला होता. यादरम्यान त्याची पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न केलं. यामुळे नारायण सोनी हा नैराश्यात होता. त्याने याप्रकरणी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधून मध्यस्थी करावी अशी विनंती केली होती. पण शरद पवार यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपीच्या मनात राग होता.
यातूनच नारायण सोनी याने सिल्व्हर ओकवर फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी नारायण सोनीविरुद्ध पोलिसांनी भादंवि कलम 294, 506(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे नारायण सोनी याने याआधीही शरद पवार यांना धमकीचा फोन केला होता. त्यावेळीही त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा तंबी देत सोडून दिलं होतं.
हे ही वाचा : Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ
याआधीही शरद पवार यांना धमकी
दरम्यान, याआधीही शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या तरुणाने शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांकडून चौकशी सुरु करण्यात आली. याप्रकरणी निखिल भामरे नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण बागलाणकर या युजरनेमचा वापर करत होता. त्यांने आक्षेपार्ह ट्विट केलं होतं. या ट्विटमध्ये त्याने, 'वेळ आली आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करायची. #बाराचा_काका_माफी_माग.' असं लिहिलं होतं. या ट्विटवरून जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र पोलिसांना टॅग करत कठोर कारवाईची मागणी केली होती.