BMC Pre-monsoon work : सध्या संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांची लगबग सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त भूषण गगराणी हे जोमाने कामाला लागले आहेत. येत्या 15 मे आधी मुंबईतील मान्सून पूर्व काम पूर्ण करणार, असे निर्धार भूषण गगराणी यांनी केला आहे. मुंबईत ठिकठिकाणी नालेसफाईचे काम सुरु आहे. याबद्दल बैठक घेण्यात आली असून त्याकडे व्यवस्थितरित्या लक्ष दिलं जात आहे, असेही भूषण गगराणी यांनी म्हटले.
मुंबईत दरवर्षी मुसळधार पाऊस कोसळतो. त्यामुळे दादर, हिंदमाता, भायखळा, परळ या ठिकाणी सखल भागात पाणी साचते. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीचा बोजवारा उडतो. तसेच नागरिकांना वाहतूक कोंडीसह साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते. पण यंदा पावसाळ्यापूर्वी महापालिकेकडून पर्जन्यजल वाहिन्यांच्या साफसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या सर्व काम सुरळीत सुरु आहेत. तसेच मान्सून पूर्व कामांचे नियोजन आधीच करण्यात आले आहे. येत्या 15 मे पूर्वी कामे पूर्ण करायची आहेत. याचे परिणाम येत्या 15 ते 20 दिवसात दिसतील, असेही भूषण गगराणी म्हणाले.
मुंबई महापालिकेकडून पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी नालेसफाईचे काम सुरु आहे. तसेच वॉर्ड पातळीवरही मशिनरी घेतली जात आहे. याबद्दल बैठका झालेल्या आहेत. मुंबईत पाणी साचण्याच्या नेहमीच्या ठिकाणांवर व्यवस्थित लक्ष दिलं जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत डीप क्लीन ड्राईव्ह म्हणजेच स्वच्छता सखोल स्वच्छता अभियान सुरू केलं होतं. मध्यंतरीच्या काळात निवडणुका घोषित झाल्या. त्यानंतर ही मोहिम थंडावली होती. त्यानंतर आता हे डीप क्लीन मोहीम नवीन आयुक्त भूषण गगराणी रुजू झाल्यानंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. मुंबईत कुलाब्यापासून सुरु झालेले डीप क्लीन ड्राईव्ह अभियान पश्चिम उपनगरापर्यंत होणार आहे. यावेळी आयुक्तांनी सह आयुक्तांबरोबर पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.
सध्या मुंबईत पाणीसाठा कमी आहे. गेल्यावर्षी तुलनेने कमी पाऊस झाला होता. त्यामुळे पाणीसाठा कमी झाला होता. याबद्दलचे नियोजन व्यवस्थित झालेले आहे. काही ठिकाणी टँकर लावावे लागतात, पण त्याचं कारण वेगळं आहे. काही ठिकाणी पाणी जितकं मंजूर केलं आहे, त्यापेक्षा त्याची मागणी जास्त होत आहे. पण 15 जुलैपर्यंत पाण्याची अडचण येणार नाही, असेही भूषण गगराणी यांनी म्हटले.