वंचित बहुजन आघाडीची नवी खेळी, पालिका निवडणुकीत 'या' पक्षांसोबत आघाडी

मुंबईच्या पातळीवर एक नवा पर्याय उभा करण्याचा वंचित बहुजन आघाडीचा प्रयत्न

Updated: Dec 13, 2021, 02:45 PM IST
वंचित बहुजन आघाडीची नवी खेळी, पालिका निवडणुकीत 'या' पक्षांसोबत आघाडी title=

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी (BMC Election 2022) वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) तयारीला लागली आहे. महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) आणि मुस्लिम लीग (Muslim League) सोबत आघाडी करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. 

उद्यापासून प्रचाराला सुरुवात करणार असून जानेवारीत जागा वाटप जाहीर करणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.  निवडणुका पुढे ढकलण्याचा संविधानात अधिकार नाही,  कोविड किंवा इतर मुद्द्यावर निवडणुका पुढे ढकलणे चुकीचं आहे, उद्या युद्ध झाले आणीबाणी लागली तरी निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

MIM ला धक्का
यावेळी MIM आमच्यासोबत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या वेगळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र होतो, पण पालिका निवडणुकीसाठी आम्ही एकत्र नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

काँग्रेसबरोबर युतीला तयार
वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत (Congress) युती करायला तयार आहे, तुम्ही ज्या जागा हरल्या आहात त्या आम्हाला द्या अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे केली होती. पण काँग्रेसच्या मनात भीती आहे की हरलेल्या जागा हे जिंकतील, त्यामुळे आपलं पुढे काय होणार असा प्रश्न त्यांना सतावत आहे, त्यामुळे ते युती करायला घाबरत आहेत, असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आम्हाला भाजपची बी टीम म्हटल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

शिवसेना (Shiv Sena) आमच्यासोबत आली तरी आम्ही तयार आहोत, पण ते आमच्या सोबत आले पाहिजेत, असा पर्याय प्रकाश आंबेडकर यांनी सुचवला आहे. 

सरकार ओबीसींना फसवत आहे
राज्य सरकार ओबीसींची  (OBC Reservation) फसवणूक करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. राज्य सरकारला माहित होतं, की ओबीसी आरक्षणासाठी लागू करण्यात आलेला वटहुकूम कोर्टात टिकणार नाही, तरीही त्यांनी वटहुकूम काढला, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.