लॉकडाऊनबाबत अजून निर्णय किंवा चर्चा नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे

नियम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक

Updated: Nov 24, 2020, 06:23 PM IST
लॉकडाऊनबाबत अजून निर्णय किंवा चर्चा नाही - आरोग्यमंत्री राजेश टोपे title=

दीपक भातुसे, मुंबई : लॉकडाऊनबाबत अजून चर्चा किंवा निर्णय़ झाला नसल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. अनलॉक मोठ्या प्रमाणात केल्याने दुसरी लाट कदाचित येऊ शकते, पण ती किती मोठी असेल हे सांगता येत नाही. जनहिताचा दृष्टीने आपल्याला अनलॉक करावं लागलं, लोकांना विनंती आहे यासाठी जे नियम केलेत ते काटेकोरपणे पाळले पाहिजे. बाजारात गर्दी करून लोकं विना मास्क फिरत आहेत. असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

'आपली संख्या वाढत असेल आणि लोक ऐकणार नसतील तर काही निर्बंध टप्प्याटप्प्याने घालावे लागतील. याबाबत नियम करण्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर एक बैठक होईल आणि छोटे निर्बंध लावता येतील का याचा निर्णय घेऊ. पण लॉकडाऊन नसेल, कुणीही घाबरण्याचं कारण नाही.'

'राज्याची स्थिती समाधानकारक आहे. संख्या कमी झाली आहे. गोवा, केरळ, दिल्ली अनेक राज्यात वाढ होत आहे. देशाच्या तुलनेत राज्याचा वाढीचा दर खूप कमी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टेस्ट कमी झाल्या. पुन्हा आपण टेस्ट वाढवतोय. त्यामुळे २ हजारावर आलेला आकडा ४ हजारवर गेलेला दिसतोय.' असं देखील टोपे यांनी म्हटलंय.

'जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही टार्गेट देतोय. सार्वजनिक ठिकाणी काम करणार्‍यांची तपासणी केली पाहिजे. लक्षणे आहेत त्यांची तपासणी, टेस्टिंग वाढवा ही पंतप्रधानांची सूचना आहे. लसीबाबत पंतप्रधानांबरोबर चर्चा झाली. आपल्या देशात दोन भारतीय आणि ३ खाजगी लस उपलब्ध होतील. आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि ज्येष्ठ नागरीक यांना पहिली लस दिली जाईल. स कधी येईल हे खात्रीशीर सांगू शकत नाही. लसीचा परिणाम किती महिने राहिल हा प्रश्न आहेच.' असं देखील आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

'लस देण्यासाठी किती प्रशिक्षित कर्मचारी हवेत याचा डेटा तयार करतोय. लसीकरणाच्या कार्यक्रम केंद्र सरकारकडून राबवला जाईल. आपण त्यांना मदत करू.'